Indian Railway Ticket Booking App अकोला : रेल्वेच्या विविध सेवांसंदर्भात असंख्य ॲप उपलब्ध आहेत. प्रवाशांना ते हाताळतांना अडचणींचा सामना कराव लागतो. शिवाय मोबाईलमध्ये जागेचा देखील प्रश्न असतोच. यावर रेल्वेने आता एक तोडगा काढला आहे. आता रेल्वे सेवांच्या अनेक ॲपची डोकेदुखी संपली असून एकाच ॲपवर सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी एक अभिनव आणि सर्वसमावेशक मोबाईल अ‍ॅप ‘रेलवन (RailOne)’ विकसित करण्यात आले. प्रवाशांना रेल्वे संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी सहजपणे वापरता याव्यात, या दृष्टीने ते तयार करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

‘रेलवन’ अ‍ॅप प्रवाशांसाठी एक ‘वन-स्टॉप सोल्युशन’ आहे. या अ‍ॅपद्वारे तिकीट सेवा ज्यामध्ये आरक्षित, अनारक्षित आणि फलाट तिकीट नोंदणी, पीएनआर व रेल्वे चौकशी, यात्रा नियोजन, रेल्वे मदत सेवा, रेल्वे गाडीतील भोजन नोंदणी आणि मालवाहतूक संबंधित चौकशी सेवा वापरणे शक्य होणार आहे. या अ‍ॅपचा मुख्य उद्देश वापरकर्त्यांना एक सुलभ आणि आकर्षक अनुभव देणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्व सेवा सहज उपलब्ध होतात.

विविध सेवांमध्ये सुसंगतता असल्यामुळे वापरकर्त्यांना एकत्रित अनुभव मिळतो आणि वेगवेगळ्या ॲपची गरज पडत नाही.‘रेलवन अ‍ॅप’मध्ये सिंगल साइन-ऑन फीचरद्वारे, वापरकर्ते रेल कनेक्ट किंवा युटीएस ऑन मोबईल अ‍ॅपमधील आपल्या विद्यमान ‘यूजर आयडी’चा वापर करून प्रवेश करू शकतात. यामुळे अनेक ॲप डाऊनलोड करण्याची गरज राहत नाही आणि मोबाईलमधील जागा देखील वाचते.

‘रेलवन अ‍ॅप’मध्ये रेल्वे ‘ई-वॉलेट’ सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तिकिट घेण्याची प्रक्रिया अधिक जलद व सोपी होते. यासोबतच, सांख्यिक पीन आणि बायोमेट्रिक लॉगिन यासारख्या सुरक्षित आणि सोप्या पर्यायांनी अ‍ॅपचा वापर अधिक सुलभ केला आहे.

नवीन वापरकर्त्यांसाठी जलद नोंदणी

नोंदणी प्रक्रिया कमीतकमी माहितीवर आधारित असून, ती अतिशय सोपी आणि झपाट्याने पूर्ण होते. केवळ चौकशी करणारे वापरकर्ते देखील अतिथी म्हणून प्रवेश करून वापर करू शकतात. आपला मोबाईल क्रमांक व ओटीपीच्या सहाय्याने लॉगिन करता येऊ शकते. रेलवन अ‍ॅपमुळे भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध आहेत. प्रवाशांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असून, डिजिटल भारताच्या दिशेने आणखी एक मजबूत टप्पा ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.