महेश बोकडे

नागपूर : महानिर्मितीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या १५४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. परंतु या भरती प्रक्रियेत अनुभव कालावधी पूर्ण नसतानाही काही उमेदवार पात्र ठरल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे.

महानिर्मितीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाच्या १५४ जागांसाठी २७ डिसेंबर २०२२ रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. त्यात आधी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब होणार नव्हता. परंतु परीक्षेदरम्यान नकारात्मक गुण पद्धती असल्याचे संगणकावर प्रदर्शित झाले. नंतर मात्र काही केंद्रांवर नकारात्मक गुणपद्धती अवलंबणार नसल्याची घोषणा झाली. शेवटी नकारात्मक गुणपद्धती अवलंबली गेली नाही. या विरोधात काही परीक्षार्थीनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी झाली. त्यानंतर पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रकाशित झाली. परंतु पात्र उमेदवारांच्या यादीत काहींनी आवश्यक अनुभवाचा कालावधी पूर्ण केला नसताना तसेच योग्य शैक्षणिक अर्हता नसतानाही त्यांना नोकरीसाठी पात्र ठरवल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे.

हेही वाचा >>>“शिवपुराणाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; मंडपातील तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबांचे फोटो काढा”, रुपराव वाघ यांची मागणी

शासन परिपत्रक २००४नुसार, अनुभव कालावधीची गणना कशी करावी हे स्पष्ट आहे. परंतु प्रशिक्षण अभ्यागत असताना विद्यावेतनादरम्यानचा कालावधीही अनुभव म्हणून गणला जाऊन अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदासाठी लागणाऱ्या योग्य शैक्षणिक अर्हतेत अभियांत्रिकी पदवीनंतरचा पात्र पदाचा म्हणजेच साहाय्यक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता या पदाचाच अनुभव ग्राह्य धरणे आवश्यक असताना अभियांत्रिकी पदविका शैक्षणिक अर्हतेवर कनिष्ठ अभियंता या पदावर निवड झालेले पदवीधारक उमेदवारसुद्धा पात्र ठरवले गेले.

ऑनलाइन परीक्षेतील गुणांना ७० टक्के गुणांमध्ये रूपांतरित करून तसेच वैयक्तिक मुलाखतीतील गुण ३० टक्के गुणांमध्ये रूपांतरित करून अंतिम निवड यादी तयार होणार होती. परंतु अंतिम गुणांची आकडेवारी करताना टक्केवारी न घेता ऑनलाइन परीक्षेच्या गुणांना ७० गुणांमध्ये आणि मुलाखतीच्या गुणांना ३० गुणांमध्ये परावर्तित करण्यात आले. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेचे गुण ४६.६७ टक्के आणि मुलाखतीचे गुण ६० टक्के गणले गेले. अंतिम गुण चुकीच्या पद्धतीमुळे गणल्यामुळे अनेक उमेदवार ऑनलाइन परीक्षेत चांगले गुण असूनही निवड प्रक्रियेतून बाहेर फेकले गेले. निवड न झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचे गुणसुद्धा प्रकाशित न करता लपवून ठेवल्याचा परीक्षार्थीचा आरोप आहे.

हेही वाचा >>>सिंदखेडराजा बाजार समितीत युतीचा जल्लोष, सभापतीपदी अनिल तुपकर तर विष्णू मेहेत्रे उपसभापती

प्रक्रिया पारदर्शी असल्याचा महानिर्मितीचा दावा

महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने ही पदभरती प्रक्रिया पारदर्शी झाल्याचा दावा केला आहे. ऑनलाइन परीक्षेपूर्वी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब करण्यात येईल, अशी ओळ नजरचुकीने ‘स्क्रीन’वर झळकली. परंतु परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वीच नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कंपनीच्या प्रचलित भरती प्रक्रिया नियमानुसार कार्यवाही झाली. नियमानुसार अनुभव कालावधीची गणना केली. कंत्राटी किंवा अस्थायी प्रशिक्षणार्थीचा अनुभव ग्राह्य धरला नाही. केवळ स्थायी/ कायमस्वरूपी निवड झालेल्यांचा अनुभव ग्राह्य धरला. शासन परिपत्रक २००४ ची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली. १५० गुणांची ऑनलाइन, ५० गुणांची वैयक्तिक मुलाखत, असे गुणांकन स्वरूप असून ऑनलाइनच्या ७० टक्के आणि वैयक्तिक मुलाखतीच्या ३० टक्के, असे सूत्र वापरले गेले. त्यामुळे भरती प्रक्रिया पारदर्शक असून त्यात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे महानिर्मितीने स्पष्ट केले आहे.