नागपूर : दीक्षाभूमीवर दरवर्षी होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अवघ्या काही दिवसांवर असताना प्रशासन व दीक्षाभूमी स्मारक समितीद्वारा आवश्यक तयारी होत नसल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी रविवारी आंदोलन केले.

यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र, दीक्षाभूमी परिसरात सोहळ्याची तयारी सुरू झालेली नाही. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत तयारी सुरू करण्याची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी दुपारी आंदोलनासाठी मोठ्या संख्येत अनुयायी एकत्रित झाले. संवेदनशील विषय असल्याने तसेच मागील अनुभव लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत पोलिसांचा ताफाही तैनात करण्यात आला होता. दुपारी दोनच्या सुमारास अनुयायांची संख्या वाढत असताना स्मारक समितीच्यावतीने सचिव सुधीर फुलझेले स्वत: चर्चेसाठी पुढे आले. त्यांनी अनुयायांचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

अनुयायांची चिंता स्वाभाविक आहे, मात्र समिती आणि प्रशासन सोहळ्याची जय्यत तयारी करत आहे, असे फुलझेले म्हणाले. समाज माध्यमांमध्ये समितीबाबत काहीही चर्चा सुरू असली तरी धम्मदीक्षा सोहळ्यासाठी समितीतील सर्व सदस्य एकत्रित आहे, असे फुलझेलेंनी उपस्थितांना सांगितले. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सुधीर फुलझेले यांनी सोहळा दरवर्षीप्रमाणे थाटातच होईल, अशी हमी दिल्यावर आंदोलन शांततेत समाप्त करण्यात आले. फुलझेले यांनी चर्चेच्या माध्यमातून उपस्थित अनुयायांच्या सर्व शंकाना दूर केले आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. फुलझेले यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर अनुयायांनी शांततेत आंदोलन समाप्त केले.

विकासासाठी न्यायालयामार्फत लढा

दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासाकरिता स्मारक समिती प्रतिबद्ध आहे. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी मागील अनेक वर्षे रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. मात्र, आता न्यायालयाच्या मार्फत दीक्षाभूमीचा विकास प्रयत्न केला जात आहे. शासनाकडून समितीकडे कुठलाही थेट निधी येत नाही. नागपूर सुधार प्रन्यासमार्फत विकासकार्य केले जातात. आता न्यायालयीन लढ्याला गती मिळाल्याने लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे फुलझेले यांनी सांगितले.

विरोध केवळ अंडरग्राऊंड पार्किंगला; सौंदर्यीकरणाला नाही

चर्चेदरम्यान दीक्षाभूमीच्या विकासासाठी शेजारील जागेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. शासन जर शेजारील जागा देत नसेल तर सांगा सर्व अनुयायी जाऊन भिंत तोडून येतील, असा इशारा काही अनुयायांनी दिला. आमचा विरोध केवळ अंडरग्राउंड पार्किंगला होता, दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाला नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या विरोधामुळे दीक्षाभूमीचा विकास रखडला हा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप उपस्थितांनी केला. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे संयम बाळगण्याची विनंती स्मारक समितीने अनुयायांना केली.