भंडारा : आदिवासी वस्ती पाड्यांवर रस्त्यांअभावी रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळत असते. मंगळवारी भंडारा जिल्ह्यात एका गर्भवती महिलेला घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका चिखलमय रस्त्यात फसल्याची बातमी लोकसत्ताने प्रकाशित केली होती. या वृत्तानंतर प्रशासनाला जाग आली आणि रात्रभरात या रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला.

तुमसर तालुक्यातील तामसावाडी येथील एका गर्भवतीला प्रसूती कळा आल्याने गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्याकरिता रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र, ऐन पावसाळ्यात गावात करण्यात आलेल्या अर्धवट कामामुळं रस्त्यावर निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका फसली. यामुळे गरोदर महिलेला चिखलातूनच पायी वाट काढत जावे लागले होते.

पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या चिखलात रुग्णवाहिका काल फसली होती. प्रसूतकळा येत असताना गर्भवती महिलेला चिखलातून वाट काढून पायदळ जावं लागलं. ही बातमी लोकसत्ताने प्रसारित केली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तामसवाडी गावातील चिखलयुक्त रस्त्यावर रात्रभरात डांबर टाकून रस्त्याचं काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पावसात सार्वजनिक बांधकाम विभागांनं इथे डांबर रस्त्याची निर्मिती केली असली तरी आता भर पावसात केलेल्या या रस्त्याच्या बांधकामावर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.