अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सुमारे १९ गावे मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत या गावांचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मतदार यादीत ही गावे नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आणि या गावांमधील मतदारांसाठी हा अत्यंत गंभीर विषय आहे. या गावांमधील मतदार निवडणुकीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
शशिकांत मंगळे यांनी ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करून मतदार यादीतील ही त्रुटी दूर करण्याची आणि गायब झालेल्या गावांचा पुन्हा समावेश करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात तसेच सामान्य जनतेमध्येही चर्चेला उधाण आले आहे.
शशिकांत मंगळे म्हणाले, मतदार याद्यांची पाहणी करीत असताना माझ्या निदर्शनास आले की काही गावेच्या गावे या मतदार यादीतून गायब आहेत. पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा मोरे आणि धनेगाव ही गावे मतदार यादीत नाहीत. कापूसतळणी गणामध्ये रौंदळपूर, पोही, रत्नापूर, जवळा, औरंगपूर, सौदापूर ही गावे मतदार यादीतून बेपत्ता झाल्याचे दिसत आहे.
चौसाळा, भंडारज या गणामध्येही हाच प्रकार आढळून आला आहे. काही गावांना दुसऱ्याच मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहे. काही गावे उजाड जरी असली, तरी त्याची नोंद निवडणूक आयोगाच्या प्रारूप मतदार यादीत असते. या गावांना उल्लेख निवडणूक आयोगाने केला नाही, असे शशिकांत मंगळे यांनी सांगितले.
शशिकांत मंगळे म्हणाले, या संपूर्ण प्रकरणावरून निवडणूक आयोगाची यंत्रणा ही निवडणुकीविषयी किती बेपर्वा आहे, हे दिसून येते. निवडणूक लढणारे सर्वच उमेदवार स्पर्धेत असतात. पण, आपली मतदार यादी कशी आहे, याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महाराष्ट्रातील राजकारणात अशा प्रकारच्या मतदार यादीतील अनियमितता हा एक संवेदनशील विषय मानला जातो, विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण महत्त्वाचे ठरले आहे. या प्रकरणावर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.