अमरावती : मी केवळ आमदाराला कापा म्हटले, तर केवढी आग लागली. कापलेच नाही अजून. रोज बारा ते तेरा शेतकरी आत्महत्या करताहेत, कोणाला आग लागली नाही. आमदाराला कापा म्हटले, तर आम्ही लोकशाहीचा गळा घोटला, अशी टीका आमच्यावर होते. बाप शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा तुमची लोकशाही कुठे जाते, असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी केला.
दर्यापूर तालुक्यातील शिवर येथे आयोजित शेतकरी हक्क परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. बच्चू कडू म्हणाले, आम्ही जाती-पातीत, वेगवेगळ्या पक्षात वाटले गेलो. उद्धव ठाकरेंबद्दल कुणी बोलायचे नाही, देवाभाऊंविषयी शब्द काढायचा नाही. बच्चू कडूंवर काही बोलायचे नाही, पवारांविषयी बोलला, तर पहा कधी, राहुल गांधी आमचा माणूस आहे, असे इशारे दिले जातात. पण, शेतकरी मेला तरी चालते. पक्षाचा झेंडा हाती घेतला, की सर्वकाही घरबसल्या होते, ही मानसिकता आता शेतकऱ्यांनी बदलली पाहिजे. त्यांना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. सोयाबीन हमीभावापेक्षा कितीतरी कमी किंमतीत विकावे लागते, तरी शेतकऱ्यांना संताप येत नाही. हेच जर चित्र जर पंजाबमध्ये असते, तर हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले असते आणि सरकारला जेरीस आणले असते. पण, आम्ही एकत्र येत नाही.
बच्चू कडू म्हणाले, मी तीस वर्षांच्या राजकारणात कुठल्याही पक्षात गेलो नाही. गेलो असतो, तर आम्ही कायमचे आमदार राहिलो असतो. पण, कायमचे त्या पक्षाचे गुलाम झालो असतो. बच्चू कडू स्वतंत्र आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या लढाईसाठी सज्ज आहे. आंदोलनात माझे मरण जरी झाले, तरी सरकारवर काहीही फरक पडणार नाही, पण शेतकरी जर जागा झाला, तो रस्त्यावर उतरला, तर सरकारला उठबशा काढाव्या लागतील.
बच्चू कडू म्हणाले, शेतकरी, शेतमजूर गरीबच रहावा, हेच सरकारचे धोरण आहे. कुठल्याही पक्षाचा झेंडा हाती घ्या, पण तो झेंडा ज्या कापसापासून बनतो, तो कापूस शेतकरी पिकवतो, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आपण जाती-धर्माच्या लढाईत एकत्र येतो, पण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही, हे मोठे दुर्देव आहे. आपण पक्षांचे गुलाम बनलो आहोत. पक्षाचे झेंडे हाती घेणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुमचा बाप जगला पाहिजे. कुठल्याही पक्षावर, नेत्यावर निष्ठा ठेवू नका, ठेवायचीच असेल, तर मी आई-वडिलांवर ठेवा. आपल्या जमिनीवर निष्ठा ठेवा. ती तुम्हाला एका दाण्याचे शंभर दाणे देते.
