अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध १७ मागण्यांसाठी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत चालल्याने प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच गुरूवारी सकाळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगावपेठ टोल नाक्याजवळ टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच महामार्गावर पोहचून टायर जाळण्यास सुरूवात केली. काही कार्यकर्त्यांनी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आणून टाकल्या. त्यांनाही पेटवून देण्यात आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांच्या मागण्यांची सरकारने अजूनही दखल घेतली नाही, हे दुर्देवी आहे. सरकार जागे न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद करू, असा इशारा यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी दिला.
बच्चू कडूंच्या पत्नी आंदोलनस्थळी
बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू आणि त्यांचे पूत्र देवा कडू हे बुधवारी आंदोलनस्थळी पोहचले. त्यांनी बच्चू कडू यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. खासदार नीलेश लंके यांच्यासह मराठा नेते मनोज जरांगे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल बच्चू कडू यांची भेट घेतली. अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
विशेष वैद्यकीय पथक
बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या पथकाला आंदोलक बच्चू कडू आणि इतरांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नियुक्त करण्यात आले असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील एका तज्ज्ञ डॉक्टरांचाही यात समावेश आहे. हे पथक दिवसातून दोन वेळा आंदोलकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. आवश्यक उपाययोजना करून त्याचा अहवाल दररोज दोन वेळा सादर करण्यास या पथकाला सांगण्यात आले आहे.
बच्चू कडू यांनी यापूर्वी २४ मे रोजी आणि ४ जून रोजी निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.