अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना समाज माध्यमावरील रीलच्या माध्यमातून अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी संबंधित खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. माझे इन्स्टाग्रामवर विनोद नावाचे अकाऊंट असून मी नेहमी चालू घडामोडी आणि त्यावरील मित्रांचे स्टेटस पाहत असतो. याशिवाय राजकीय घडामोडी तसेच माजी खासदार नवनीत राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्यासंदर्भातील पोस्टवरही लक्ष ठेवतो. काल रात्री मी माझे इन्स्टाग्राम अकाऊंट पाहत असताना मला इसाभाईएस या अकाऊंटवर एक रील दिसली. त्यात लाल रंगाचा शर्ट घातलेला तरूण एका वाहनात बसून नवनीत राणा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसला. यात या तरूणाने नवनीत राणा यांना अश्लिल शब्दात शिवीगाळ केली. हा देश सर्व धर्मीय लोकांचा आहे. तू जर जातीयवादाच्या गोष्टी करशील तर यावेळी सोडले जाणार नाही, थेट ठार मारले जाईल, अशा शब्दात धमकी दिल्याचे विनोद गुहे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

समाज माध्यमांवरील या रीलवर लाल शर्ट घातलेला तरूण अत्यंत घाणेरड्या शिव्या देत नवनीत राणा यांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या तक्रारीच्या आधारे संबंधित अकाऊंट धारकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २९६, ३५१(३), ७९ तसेच सहकलम ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यापुर्वीही नवनीत राणा यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आमिर नावाच्या व्यक्तीने तीन दिवसांत धमकीची दोन पत्रे पाठवली होती. त्यात त्याने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पत्रात पाकिस्तान झिंदाबाद असेही लिहिले होते. आपल्यावर कितीही गुन्हे दाखल झाले, तरी पोलीस आपले काहीच बिघडवू शकत नाही, त्यामुळे यातून सुटण्यासाठी पैसे पाठवावेच लागतील, अशा स्वरूपाची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात स्वीय सहायक विनोद गुहे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता आता रीलच्या माध्यमातून नवनीत राणा यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.