अमरावती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्हा वकील संघातर्फे घटनेचा निषेध करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने मंगळवारी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. शेकडो वकिलांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. वकील संघाच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली.

जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड सुनील देशमुख, सचिव ॲड अमोल मुरळ, ॲड प्रशांत देशपांडे यांच्यासह वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. वकिलांनी यावेळी आपल्या तीव्र भावना मांडल्या.

सोमवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात अतिशय घृणास्पद आणि दूर्भाग्यपूर्ण अशी घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात कामकाजाच्या दरम्यान अॅड राकेश किशोर यांनी बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही देशात एक वकील सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, ही अतिशय घृणास्पद अशी घटना आहे. हा न्यायपालिकेच्या इतिहासातील काळकुट्ट असा दिवस आहे. सर्वात दुर्भाग्यपूर्ण अशी गोष्ट म्हणजे, त्यानंतर अॅड. राकेश किशोर यांनी धर्माच्या नावाचा उल्लेख केला. यावरून असे दिसते की, अॅड. राकेश किशोर यांच्यावर कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्यात येईलच, परंतु त्यांच्या मागे असलेली मानसिकता ठेचून काढणे, आज काळाची गरज आहे, अन्यथा न्यायपालिकेचा अंत होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे अमरावती जिल्हा वकील संघ या भ्याड घटनेचा अतिशय तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे आणि तसा ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, रवी राणा, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी निषेध व्यक्त केला असून हा संविधानाचा अपमान असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.