अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अमरावती विभागात मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के कोणालाही मिळवता आले नाही.
बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. अमरावती विभागातील २८३ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शून्य टक्के निकाल किती कॉलेजचा
अमरावती विभागात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये केवळ ३ आहेत. यंदा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.०० टक्के होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.४३ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.५७ ने कमी झाला आहे.
उत्तीर्णतेच्या बाबतीत यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. अमरावती विभागातून एकूण ६७ हजार १८८ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी ६३ हजार ३५२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. हे प्रमाण ९४.२९ टक्के आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ८८.९७ इतकी आहे.
कॉपीची प्रकरणे किती
अमरावती विभागात एकूण १० परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार म्हणजेच कॉपीची १७ प्रकरणे निदर्शनास आली आहेत. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेमध्ये ज्या केंद्रांवर गैरमार्ग प्रकरणे होतील, त्या केंद्रांची मान्यता यापुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल, असे आधीच जाहीर करण्यात आले होते. अमरावती विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान १० केंद्रांवर गैरमार्ग प्रकरणे आढळून आली आहेत. त्यामुळे चौकशीनंतर ही केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या केंद्रांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे.
कशी आहे सुनावणीची प्रक्रिया
बारावीच्या परीक्षेत भरारी पथकाला विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यानंतर पथक त्याच्यावर कारवाई करते. विद्यार्थ्याच्या दोषानुसार मंडळाची कारवाईची नियमावली आहे. यामध्ये एक परीक्षा ते पाच परीक्षापर्यंत बंदी घातली जाते. कॉपी प्रकरणाच्या सुनावणीत विद्यार्थ्याला आपले म्हणणे समितीसमोर मांडण्याची मुभा असते. यामध्ये विषय तज्ञ व मंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी असतात. विद्यार्थ्याने केलेला गुन्हा लक्षात घेत कारवाई निश्चित केली जाते. त्यात विद्यार्थ्यांचे म्हणणे ही ऐकून घेऊन प्रकरणातली गंभीरता ही लक्षात घेतली जाते व त्यानंतर निर्णय निश्चित केला जातो. निकालापूर्वी ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाते.