अमरावती : शहरातील जन्म दाखल्यांचे प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. ऑगस्ट २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीतील सुमारे २८०० जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शहरात येऊन पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी लावून धरली. मात्र, या मुद्यावर सत्तारूढ दोन पक्षातील नेते आमने-सामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांनी या प्रकरणात पोलिसांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये, अशी सूचना केली आहे.

शहरासह जिल्ह्यात बांगलादेशी व रोहिंग्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरमार्गाचा वापर करून उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे काढल्याचे आरोप सातत्याने करणारे किरीट सोमय्या काल अचानक अमरावती शहरात पोहचले. त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांचीही भेट घेतली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदार सुलभा खोडके यांनी एकही दाखला रद्द होऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, किरीट सोमय्या यांनी सुलभा खोडके यांना व्याकरण समजले नसावे, असा टोला लगावला. आमदार खोडके यांना व्याकरण समजत नसावे, किंवा आम्हालाच त्यांचे व्याकरण कळत नसावे. कारण प्रशासनाने स्पष्टपणे पत्रात नमूद केले आहे की, नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने जारी दाखले रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रद्द न करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जन्म दाखले रद्द करण्यात आले आहेत, ते आता परत घेतले जात आहेत, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, आमदार संजय खोडके यांनी किरीट सोमय्या यांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले. ज्यांनी कागदपत्रांमध्ये खोडतोड करून जन्मदाखले मिळवले, त्यांचे दाखले रद्द करण्याची कारवाई योग्यच. पण, केवळ तांत्रिक चुकांसाठी सरसकट जन्म दाखले रद्द करण्याचे काहीच कारण नाही. या संपूर्ण प्रकरणात वितरीत करण्यात आलेल्या जन्म दाखल्याची योग्य पडताळणी करण्याची गरज आहे. याशिवाय कुणाच्याही दबावाखाली येऊन पोलिसांनी कारवाई करू नये, अशा सूचना आपण यापुर्वीच दिल्या आहेत, असे संजय खोडके म्हणाले. आपण यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. लोकांना त्रास होऊ नये, अशीच आमची भूमिका असल्याचे खोडके यांनी सांगितले.