नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेल्या अमरावती मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी २४ तासातच बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.अमरावती मर्गावरील तब्बल १९१ कोटींच्या ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. परंतु, या उड्डाणपुलावर अडथळ्यांमुळे वाहतुकीत गोंधळ निर्माण झाला.

शनिवारी पुलावर सकाळपासूनच बॅरिकेड्स आणि उद्घाटन सोहळ्यात उभारलेल्या व्यासपीठाचे साहित्य पडून असल्याने वाहनचालक त्रस्त झाले. अमरावती रोडवरील वाहतूक वळवण्यात आल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. काहींनी सकाळी बोले पेट्रोल पंपाजवळ झालेल्या अपघाताला कारणीभूत धरले, तर काहींनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. वाहतूक पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी मात्र मोठ्या अपघाताची अफवा फेटाळली. पुलावर किरकोळ अपघात झाला, पण गंभीर दुखापत नाही. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीच बॅरिकेड्स लावण्यात आले. वाहतूक पोलिसांनी पूल बंद करण्याचे आदेश दिलेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता नरेश बोरकर म्हणाले, उद्घाटनानंतर लगेच साहित्य हटविण्याचे काम सुरू झाले होते, मात्र रात्रीच्या पावसामुळे कामाला उशीर झाला. शनिवार रात्रीपर्यंत सर्व साहित्य हटवले जाईल. आज सकाळी मात्र उर्वरित पेंडलचा काही भाग आणि इतर बॅरिकेट्स हटवण्याचे काम जोरात सुरू होते.

‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’

बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरू होणारा हा उड्डाणपूल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत २.८५ किमी लांबीचा आहे. शहरातील सर्वांत वर्दळीचा हा उड्डाणपूल असून, उड्डाणपुलाला ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपूल’ असे नाव देण्यात आले आहे, तर वाडी पोलिस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उड्डाणपूल १.९५ किमी लांबीचा आहे. पुलावरील वाहनांसाठी वेगमर्यादा ८० किमी प्रतितास निश्चित केली आहे.

मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर

पुलावर एकूण ७६६ सेग्मेंट्स बसविण्यात आले असून, लॉ कॉलेज चौकात मलेशियन तंत्रज्ञानाचा वापर करून ६५ मीटर लांबीचे, २५० टन वजनाचे ६ गर्डर्स उभारण्यात आले आहेत. महाराजबाग क्लबपासून सर्व्हिस रोडवरही वाहतूक सुरू केली जाणार आहे. बांधकाम सार्वजनिक विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागांतर्गत ४७८ कोटी रुपये खर्चुन अमरावती रस्ते वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल बाधण्यात आला आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अमरावती रोडवरून ५ किमी अंतर फक्त ५ मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून सुटका होणार आहे.

अमरावती महामार्गावरील ब्लँक स्पॉट संपविणे आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मे २०२१ मध्ये दोन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील वाडी पोलिस स्टेशन ते गुरुद्वारा (१.९५ किमी) उड्डाणपूल सुरू झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) ते नागपूर विद्यापीठ कॅम्पपर्यंतच्या (२.८५ किमी) काम अंतिम टप्प्यात आले आहे. गडकरी यांच्या पुढाकाराने प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून तर वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या ५ कि.मी. अंतरावर दोन उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ झाला. अमरावती महामार्गावरील वाडी नाका ते वाडी पोलिस ठाण्यापर्यंतच्या सुमारे अडीच किमीचा उड्डाणपूल सुरू झाला.

अमरावती महामार्गावरील उड्डाणपूल प्रकल्पात, फुटाळा तलाव चौक, विद्यापीठ कॅम्पस ते आरटीओ पर्यंतच्या पुलाचे काम रेंगाळले आहे. आरटीओ कार्यालयासमोरील जुन्या नाल्यावर पूल बांधण्याचे काम केले जात आहे. याशिवाय आरटीओ ते बोले पेट्रोल पंपपर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.पहिल्या टप्प्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय ते विद्यापीठ कॅम्पसपर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. मात्र अनेक अडचणीमुळे हा मार्ग तयार करण्यासाठी विलंब झाला आहे. सध्या नाल्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जुलै २०२५ पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. एकूण ४७८ कोटींच्या दोन उड्डाणपुलाला अतिरिक्त कालावधी लागल्याने प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. आरटीओ कार्यालय ते रवीनगर चौकापर्यंतची झाडे तोडण्याची परवानगी उशिरा मिळाल्याने उड्डाणपुलाच्या बांधकामाला उशीर झाला होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.