अमरावती : महिनाभरापुर्वी शहरातील तपोवन परिसरातील एका घराच्या आवारात शिरून एका बिबट्याने पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याला उचलून नेले. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यापुर्वीही या भागात बिबट्याचा वावर आढळून आला होता. या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. पिजऱ्यात बकरी ठेवण्यात आली होती. तिच्या शिकारीसाठी बिबट्या पिंजऱ्यात गेल्याने वनविभागाला त्याला पकडणे शक्य झाले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या जंगलात सोडण्यात आले आहे.
पोहरा जंगलक्षेत्राला लागूनच तपोवन परिसर आहे. या भागात लोकवस्ती वाढली आहे. या भागात महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढला होता. गेल्या १८ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या कुंपन भिंतीवरून उडी मारून बिबट्या आवारात शिरला आणि कुत्र्याला पकडून काही क्षणातच तो जंगलाच्या दिशेने पसार झाला. या घरातील सदस्यांना काही कळण्यापुर्वीच ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळनंतर घराबाहेर पडण्याची देखील हिंमत होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने वनविभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची आणि गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. वनविभागाला अखेर या बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळाली. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेरीस या बिबट्याला सुखरूप पकडण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाले असून या बिबट्याचे वय अंदाजे १८ महिने इतके आहे. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याला मेळघाटातील अकोट वन्यजीव विभागात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसराला लागूनच तपोवन येथे गेल्या जून महिन्यात देखील बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केली होती. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित देखील झाली होती. तपोवन, विद्यापीठ, राज्य राखीव पोलीस दल आणि महादेव खोरी या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी चिंता वाढली आहे. पोहरा-मालखेडच्या जंगलातून बिबट हे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. या भागातील भटके कुत्रे हे त्यांचे भक्ष्य ठरतात. याशिवाय पाळीव कुत्र्यांवरही बिबट्यांनी हल्ले करून त्यांची शिकार बिबट्यांनी केली आहे. या प्रश्नावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.