अमरावती : अलायन्स एअर कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या अमरावती-मुंबई विमानसेवेच्या भाड्यांमध्ये अलीकडील काळात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे भाडे कमी करण्याची मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे. ही विमानसेवा सामान्य प्रवाशांसाठी सुलभ आणि परवडणारी राहावी, यासाठी खासदारांनी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री यांची भेट घेतली.
बळवंत वानखडे यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून येथे औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक कामकाजासाठी मुंबईस सतत प्रवास करणाऱ्या नागरीकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत विमानसेवेच्या भाड्यांमध्ये झालेली अनावश्यक वाढ ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे तातडीने भाडेवाढीचा फेरविचार करून ती पूर्ववत करावी.
या बैठकीदरम्यान, नागरी उड्डाण मंत्री यांनी खासदार बळवंत वानखडे यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवण्यात येईल आणि प्रवाशांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
किती आहे विमान प्रवास भाडे?
अलायन्स एअरच्या विमानाचे अमरावती ते मुंबई या प्रवासाचे किमान भाडे हे २ हजार ६२५ रुपये इतके आहे. तीन प्रकारांमध्ये या प्रवास भाड्याची रचना आहे. ‘सुपर सेव्हर’ या प्रकारात २ हजार ५२५ ते ३ हजार ८४५ रुपयांपर्यंत दर आकारले जात आहेत. त्याचवेळी गर्दीच्या दिवसांमध्ये ‘सुपर सेव्हर’ प्रकारातच ७ हजार ३५० रुपयांवर हे दर पोहचले आहेत. २२ आणि २४ ऑक्टोबरला ‘सुपर सेव्हर’ मध्ये ७ हजार ३५०, ‘व्हॅल्यू’ प्रकारात १० हजार ५०० आणि ‘फ्लेक्झिबल’ प्रकारात १७ हजार ८५० रुपयांपर्यंत दर दर्शविण्यात आले आहेत.
वेळेत बदल
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) हिवाळी वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल केले असून, येत्या २६ ऑक्टोबरपासून अमरावतीहून मुंबईला जाणारे विमान आता सकाळी ९.१५ वाजता उड्डाण घेणार आहे. तसेच, आठवड्यातून चार दिवस ही सेवा उपलब्ध होणार आहे.
ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे एकूण चार दिवस सुरू राहणार आहे.
मुंबईहून अमरावतीकडे (उड्डाण क्रमांक ९/६३३): वेळ: सकाळी ७:०५ वाजता मुंबईहून निघेल आणि सकाळी ८:५० वाजता अमरावतीला पोहोचेल.
अमरावतीहून मुंबईकडे (उड्डाण क्रमांक ९/६३४):
वेळ: सकाळी ९:१५ वाजता अमरावतीहून निघेल आणि सकाळी ११:०० वाजता मुंबईला पोहोचेल.