अमरावती : अनेक भागात वीज वाहिन्यांना वृक्षांच्या फांद्या अडथळा ठरतात. यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होतो असा पूर्वानुभव आहे. दुसरीकडे पावसाळ्यात वीज तारा, रोहित्रांवर वाढणाऱ्या वेलींचा प्रश्न गंभीर बनतो.
पावसाळ्यात वीज खांबावर व रोहीत्रावर चढणाऱ्या वेलीचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा ठरणाऱ्या व प्रसंगी अपघातालाही निमंत्रण देणाऱ्या वेली व झाडे-झुडूपे काढण्याची मोर्शी विभागाने मोहीम हाती घेत एकाच दिवशी ५९३ वीज खांब व वाहिन्यावरील आणि १४२ रोहित्रावरील वेली काढण्यात आल्या.
महावितरणची वीज वितरण व्यवस्था उघड्यावरच आणि वना-रानात अशी सर्वदूर पसरली असल्याने अनेक ठिकाणीची रोहीत्रे आणि वीज खांबे ही वेली तसेच झुडूपे यांच्या विळख्यात वारंवार अडकतात आणि वीज यंत्रणा असुरक्षित करतात. परिणामी, थोडी जरी हवा आली तरी खंडित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागते, शिवाय वेली व झुडूपे ही ओली असल्यामुळे यात व खांबाला लावलेल्या टेन्शन तारांमध्ये वीज प्रवाह उतरण्याची शक्यता अधिक असते.
हे अपघाताचे कारण बनू नये म्हणून जिल्हयात सुरक्षित वीज यंत्रणेतून वीज पुरवठा करण्यासाठी मुख्य अभियंता अशोक साळुंके आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या मार्गदर्शनात वेलीमुक्त वीज यंत्रणा करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली आहे.
कार्यकारी अभियंता विजयकुमार कासट यांनी पुढाकाराने एकाच दिवशी मोर्शी विभागात मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत महावितरणसह कंत्राटदार कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली आणि एकाच दिवसात विभागातील ३३५ ठिकाणावरील उच्चदाब वाहिन्यावर चढलेली,२५२ लघुदाब वाहिन्या आणि वीज खांबावरील आणि १४२ रोहित्रावर चढणाऱ्या वेली आणि झुडूपे काढून विभागातील संपूर्ण यंत्रणा वेलीमुक्त करण्यात आली.
मोर्शी विभागातील उपविभाग निहाय आकडेवारीनुसार मोर्शी उपविभाग-१ मध्ये वेलीमुक्त झालेल्या वीज यंत्रणेत ८३ उच्चदाब आणि २४ लघुदाब वाहिन्या व वीज खांबासह २१ रोहित्राचा समावेश आहे. मोर्शी उपविभाग -२ मध्ये उच्चदाब ३५, लघुदाब ५० आणि रोहित्रे १७, चांदूरबाजार उपविभाग उच्चदाब ६४, लघुदाब ५५ आणि रोहित्रे ३२, वरूड -१ उपविभागात उच्चदाब ७८ ,लघुदाब ३६ ,रोहित्रे १३, वरूड उपविभाग -२ मधील उच्चदाब ४२, लघुदाब ५२, रोहित्रे ३७ आणि शेंदुरजना घाट उपविभागातील ३३ उच्चदाब वाहिन्या व वीज खांब, ४० लघुदाब वाहिन्या व वीज खांब आणि २२ रोहित्रावरील वेली व झुडूपे काढून वेलीमुक्त व झुडूपे मुक्त करण्यात आली आहे.