अमरावती : समाज माध्यमांवर कोण, कधी आणि कसा लोकप्रिय होईल, याचा नेम नाही. सुमारे सहा वर्षांपुर्वी राज्यात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग निर्माण झाला, तेव्हा अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील रमेश खंडारे यांचा वऱ्हाडी भाषेतील एक विनोदी व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला आणि तो प्रचंड गाजला. त्यात रमेश खंडारे आणि एका अन्य व्यक्तीचे संवाद आहेत.

राज्यपाल म्हणत आहेत की रमेश खंडारेला मुख्यमंत्री करायचे ठरले आहे. मुंबईत अशा प्रकराची चर्चा आहे. तुझा नंबर सापडला नाही. राज्यपाल एसटी बसने तुला भेटायला येत आहेत. तर रमेश खंडारे म्हणतात, त्यांना सुरक्षा नाही का. मी मुख्यमंत्री व्हायला तयार आहे पण मला मजबूत सिक्युरिटी पाहिजे. त्याशिवाय जमणार नाही. पद भेटले नाही तरी चालते. पैशाशिवाय मी मुख्यमंत्री पद स्वीकारणार नाही. देशाची सुरक्षा पण करू, पगार पण नाही. मला अशा गोष्टींची गरज नाही. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड ‘व्हायरल’ झाला होता. त्यानंतर त्यांचे अनेक व्हिडिओ गाजले.

त्याच रमेश खंडारे यांचा राष्ट्रीय एकता विचार मंच आणि ‘डेमो’ हेही चर्चेत असतात. आता एका छायाचित्रामुळे पुन्हा रमेश खंडारे प्रकाशझोतात आले आहेत. भाजपचे मोर्शीचे आमदार उमेश यावलकर यांच्यासोबत भाजपचा दुपट्टा घातलेले रमेश खंडारे या छायाचित्रात दिसतात.

त्यावर आता एक प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. तेही व्यंग आणि विनोदी शैलीतील आहे. एका छायाचित्रामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, राष्ट्रीय एकता मंचच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये हा फोटो एका कार्यक्रमातील असून खंडारे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. सध्या परदेश दौऱ्यावर असलेले खंडारे लवकरच भारतात परतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देणार असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, रमेश खंडारे यांचे सर्वच पक्षात आणि अनेक गावांमध्ये चाहते आणि प्रशंसक आहेत. कुणीही नाराज होऊ नये म्हणून ते प्रत्येकासोबत प्रेमाने फोटो काढतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की त्यांनी पक्ष बदलला आहे. सध्या विदेश दौऱ्यावर असलेले डॉ. खंडारे मायदेशी परतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खंडारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोण आहेत रमेश खंडारे

रमेश खंडारे हे वरूडचे. घरोघरी जाऊन गॅस शेगड्या दुरुस्त करण्याचे काम खंडारे करतात. अॅटलस सायकल वरच त्यांनी आपले दुकान थाटले आहे. गेली ३० वर्ष याच सायकलवरून ते फिरून व्यवसाय करतात.