अमरावती : कित्येक वर्षे उलटली तरी जुन्या हिंदी चित्रपटगीतांची अवीट गोडी कमी झालेली नाही. १९८० च्या दशकातील ‘तोहफा’ या जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदा यांच्या चित्रपटातील ‘तोहफा तोहफा’ हे गाणे असेच गाजलेले. या गाण्याच्या चालीवर ‘कोरा कोरा’ हे विडंबन गीत तयार करून ते आता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत वापरले जात आहे. हे गाणे चांगलेच गाजत आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘७/१२ कोरा कोरा यात्रे’ला काल पापळ (अमरावती) येथून सुरवात झाली. देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावातून सुरवात होऊन ही पदयात्रा यवतमाळच्या दिशेने पुढे सरकत आहे. पापळ येथे बच्चूभाऊ कडू यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या वारसांची भेट घेतली.
मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक व्हा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले असून जात, पात, धर्म, राजकीय विचार बाजूला ठेऊन आज महाराष्ट्रातील शेतकरी एक झाला आहे. जोपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत आता थांबायचे नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. भरपावसात ही १३८ किलोमीटरची पदयात्रा सुरू आहे. १४ जुलै रोजी चिलगव्हाण येथे दिवंगत शेतकरी साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने यात्रा समाप्त होणार आहे. या यात्रेत शेतकरी, महिलांनी, तरुणांनी, आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे.
या पदयात्रेदरम्यान प्रसारीत झालेला ‘कोरा कोरा कोरा’ हा विडंबन गीताचा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे वाद्य वाजवतानाच्या जुन्या चित्रफिती वापरण्यात आल्या आहेत. दिलेले आश्वासन विसरू नका, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केव्हा करणार, असा सवाल या व्हिडिओत विचारण्यात आला आहे.
या यात्रेत कोणताही पक्षीय झेंडा नाही. ही यात्रा सरकारला दोष देण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांना जागवण्यासाठी आहे, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे. या देशात धर्म आणि जात दाखवून सामान्य कष्टकरी माणसाला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. शेती विकायची, शोषण करायचे आणि कंपनीराज आणायचे हे सरकारी षड्यंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे. शेतकरी आपल्या हक्कांप्रती जागा झाला, तर सत्तेचे सिंहासन हादरेल, असे कडू यांचे म्हणणे आहे.