अमरावती : दक्षिण मध्य रेल्वेच्या गुंटकल विभागातील धर्मावरम रेल्वे स्थानकावर यार्ड परिवर्तनचे काम करण्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यात अमरावती-तिरूपती-अमरावती एक्स्प्रेसचा समावेश होता, पण नवीन निर्णयानुसार ही रद्द करण्यात आलेली गाडी पूर्ववत करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने आधी दिलेल्या सूचनेनुसार क्रमांक १२७६६ अमरावती-तिरूपती एक्स्प्रेस दिनांक ५, ८, १२ आणि १५ मे रोजी तसेच गाडी क्रमांक १२७६५ तिरूपती-अमरावती एक्स्प्रेस ६, १०, १३ आणि १७ मे रोजी रद्द करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते. पण, या निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नवीन निर्णयानुसार ही रद्द करण्यात आलेली एक्स्प्रेस पूर्ववत धावणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क कार्यालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. अमरावती-तिरूपती-अमरावती एक्स्प्रेस नियिमित वेळापत्रकानुसार मात्र मार्ग बदलून धावणार आहे. गाडी क्रमांक १२७६६ अमरावती-तिरूपती एक्स्प्रेस दिनांक ८,१२, आणि १५ मे २०२५ रोजी मार्ग बदलून धोणे जंक्शन, गुत्ती, रेनुगुंठा आणि तिरूपती मार्गे धावेल. ही गाडी अनंतपूरम, धर्मावरम, कादिरी, मांडण्पल्ले रोड, पिलर, पकाला या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही.

गाडी क्रमांक १२७६५ तिरूपती-अमरावती एक्स्प्रेस दिनांक ६, १०, १३ आणि १७ मे २०२५ रोजी मार्ग बदलून रेनुगुंठा, गुत्ती आणि धोणे जंक्शन मार्गे धावेल. ही गाडी पकाला, पिलर, मांडण्पले रोड, कादिरी, धर्मावरम आणि अनंतपूर या रेल्वे स्थानकांवर थांबणार नाही. अमरावती-तिरूपती-अमरावती ही एक्स्प्रेस भाविकांसाठी सोयीची गाडी मानली जाते. ही एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस आहे. अमरावतीहून या एक्स्प्रेसची सुटण्याची वेळ सकाळी ६.४५ वाजताची असून अकोला, पूर्णा, नांदेड, काचिगुडा मार्गे दुसऱ्या दिवशी तिरूपतीला सकाळी ६.२५ वाजता पोहचते. १२७६६ अमरावती-तिरूपती एक्स्प्रेस दर सोमवारी आणि गुरूवारी अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटते तर १२७६५ तिरूपती-अमरावती एक्स्प्रेस ही दर मंगळवारी आणि शनिवारी तिरूपती रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.४५ वाजता सुटते आणि पिलेर, अनंतपूर, काचिगुडा, नांदेड, अकोला मार्गे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.१० वाजता अमरावती रेल्वे स्थानकावर पोहचते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता उन्हाळ्याच्या सुटट्यांमध्ये प्रवाशांनी बाहेरगावी जाण्याचे बेत ठरवले आहेत. आता रेल्वे प्रशासनाने ही गाडी पूर्ववत सुरू राहील, फक्त मार्गात बदल होईल, हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.