यवतमाळ : अमरावती वाहतूक पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो वाहनधारकांची वाहने ‘ओव्हर स्पीड’ असल्याने त्यांचे वाहन चलान केले. या संदर्भात अमरावती पोलिसांनी लोक अदालतमध्ये उपस्थित राहण्याची नोटीस या वाहनधारकांना पाठवल्याने खळबळ उडाली आहे. महामार्गावर अनेकदा वाहतूक पोलीस दिसणार नाही अशा पद्धतीने उभे राहून, ओव्हरस्पीड वाहनाचे फोटो काढून, त्यांना इ चलान पाठवतात. ही रक्कम पूर्वी एक ते दोन हजार इतकी असायची. आता त्यातही वाढ झाली आहे. यवतमाळच्या वाहनधारकांना अमरावती प्रवासादरम्यान हा अनुभव नेहमीच येतो.
यवतमाळून अमरावती येथे जाणाऱ्या वाहनधारकांना अमरावती शहरातील वैष्णव देवी रोड व वेलकम टी पॉईंट परिसरात टार्गेट केले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील (एमएच-२९) वाहनांवर मोठ्या प्रमाणात ओव्हर स्पीड या कारणावरून दंड आकारण्यात आले आहेत. यातील शेकडो वाहनधारकांना नुकत्याच लोकअदालतमध्ये हजर राहण्याची नोटीस प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणांची सुनावणी १३ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. तसे वाहतूक पोलिसांकडून सर्व वाहनधारकांना एसएमएस द्वारे संदेश प्राप्त झालेले आहेत.
यवतमाळवरून अमरावती येथे चांदुर रेल्वे मार्गे जाणाऱ्या यवतमाळ येथील वाहनांना टार्गेट केल्या जात असल्याचा आरोप वारंवार होतो. यवतमाळ येथील वाहनांना टार्गेट करून अमरावती पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर गती अधिक असल्याने दंड आकारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे यवतमाळच्या नागरिकांबाबत भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. दंडाची ही पद्धत तातडीने थांबवावी, या संदर्भात वेग मर्यादेचा पुनर्विचार करून ती वाढवावी व यवतमाळ जिल्ह्यातील वाहनांवर झालेल्या अन्यायकारक दंड माफ करावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. किरकोळ कारणांमुळे देण्यात आलेल्या अशाच चलान दंड प्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेमध्ये २१ मार्च रोजी मांडलेल्या प्रश्नांवर शासनाने या सर्व वाहनधारकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच धर्तीवर यवतमाळ येथील वाहनांना सुद्धा दिलासा देण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा रस्ते एकेरी व खडबडीत अवस्थेत होते, तेव्हा वेग मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र आता रस्ते दुहेरी झाले असून दर्जाही सुधारलेला आहे. अशा परिस्थितीत जुन्या वेग मर्यादेच्या आधारावर दंड करणे ही अन्यायकारक बाब आहे, अशी प्रतिक्रिया यवतमाळातील पीडित वाहनधारक अनिल गायकवाड यांनी दिली.