अमरावती : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून दर्यापूर येथील एका बेरोजगार युवकाची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे पिंपरी चिंचवड, पुणे येथील रहिवासी असून त्यांनी बनावट नेमणूक पत्र देऊन तक्रारदार तरूणाचा विश्वास संपादन केला आणि त्याच्याकडून रक्कम उकळली, असा आरोप आहे. या प्रकरणी दर्यापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आरोग्य सेवकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. ८ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान ही आर्थिक फसवणुकीची मालिका घडली. या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी प्रफुल्ल गजानन दिगळे (२८, रा. दर्यापूर) याच्या तक्रारीवरून सावता गोपाल म्हस्के (रा. पिंपरी चिंचवड, पुणे) व प्रशांत नामक तोतया डॉक्टरविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीने तक्रारदाराला भंडारा जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येत असलेल्या जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील आरोग्य सेवक म्हणून बनावट नियुक्तीपत्रही दिले.
सुमारे चार वर्षांपुर्वी आरोपी सावता म्हस्के याने प्रफुल्ल याच्याशी फोनवरून संपर्क साधून आरोग्य सेवकाच्या जागा निघाल्या आहेत, तुला नोकरीची गरज असेल तर मी लावून देऊ शकतो. त्यासाठी तुला १५ लाख रुपये द्यावे लागतील, असे आमिष दाखवले. सावता म्हस्के हा फिर्यादी प्रफुल्ल याच्या परिचयातील आहे. त्यावर विश्वास ठेवून प्रफुल्ल याने फोन पे आणि बँक खात्यावर १५ लाख रुपये पाठविले. प्रत्युत्तरात आरोपीने प्रफुल्ल याला भंडारा जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या आस्थापनेवर रुजू होण्याचे नियुक्ती पत्र दिले. संपूर्ण कागदपत्रे घेऊन फाईल देखील बनवली. आरोपीने म्हस्के याने प्रशांत नामक एका तोतयाची डीएचओ कार्यालयातील डॉक्टर म्हणून ओळखदेखील करून दिली. मात्र अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तथा अन्य अधिकारी कर्मचारी देखील प्रफुल्ल याला ओळखपत्र मागू लागले, तेव्हा त्याला संशय आला.
प्रफुल्ल याने जिल्हा परिषद भंडारा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गाठले. तेथे डॉक्टर प्रशांत नामक कोणीही आरोग्य अधिकारी नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे सावता म्हस्के याने आपल्याला बनावट नेमणूकपत्र दिल्याचे लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल याने पैसे परत मागितले. त्यानंतरच्या काळात आरोपीने १५ लाखांपैकी केवळ १ लाख ८० हजार रुपये परत दिले. मात्र १३ लाख २१ हजार रुपये देण्यास टाळाटाळ चालवली. आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्देशानुसार यात गुन्हा दाखल करण्यात आला.