लोकसत्ता टीम

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ७५ वर्षे पूर्ण झाले असून येथे शिकलेल्या व आता देश- विदेशात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी विमानांचे तिकीट आरक्षित केले असताना आता राष्ट्रपतींचे कारण सांगून उत्सव समितीकडून कार्यक्रमाची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी संतापले आहेत.

सोहळ्याच्या आयोजनासाठी आजी- माजी विद्यार्थ्यांची संघटना, सेवेवरील अध्यापक- विद्यार्थ्यांची आयोजन समिती गठीत करण्यात आली. त्यात अधिष्ठाता, उपअधिष्ठाता, देश- विदेशातील माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. आधी हा सोहळा २२ ते २४ डिसेंबरला होणार होता. त्यानुसार देश- विदेशातील माजी विद्यार्थ्यांनी विमानांचे तिकीट काढले.

आणखी वाचा-दिल्लीचे ठग वर्धा पोलीसांच्या जाळ्यात, असे करायचे फसवणूक

कार्यक्रमानिमित्त भारतात येत असल्याने नातेवाईक व मित्र मंडळीसोबतचे इतरही कार्यक्रम निश्चित केले. त्यासाठी हॉटेल्सपासून सर्व नोंदणी करण्यात आली. समितीने या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केले आहे. त्यांनी १ डिसेंबर ही तारीख दिल्याने आधीची तारीख बदलण्यात आली. यामुळे विदेशातील विद्यार्थी संतापले. राष्ट्रपतींची तारीख निश्चित नव्हती तर आधीच का तारीख जाहीर केली, असा त्यांचा प्रश्न आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समितीकडून सावरासावर

हा निर्णय आम्हाला वेगळ्या स्थितीत घ्यावा लागला. तरीही आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो. अडचणी असूनही, आपण सर्वांना अनुकूल असा निर्णय घेत आहोत. सर्वांना विनंती आहे की कृपया धीर धरा आणि तुमची तिकिटे रद्द करू नका. कृपया आयोजन समितीच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करा, असा संदेश अमृत महोत्सव सोहळ्याच्या व्हॉट्सएप ग्रुपवर समितीकडून टाकण्यात आला आहे.