नागपूर: शिक्षणाचा संबंध सामाजिक-आर्थिक व्यवस्थेशी देखील आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण असताना ती सुसंस्कृत असणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मंथन फॉर अ‍ॅकेडेमिया या संस्थेच्या वतीने नवीन शिक्षण धोरणावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. जागतिक दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका कशी असली पाहिजे, या अनुषंगाने चर्चासत्र आयोजित केल्याबद्दल गडकरी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. गडकरी पुढे म्हणाले, ‘शिक्षणाच्या संदर्भात कुठलाही विचार करण्यापूर्वी देशाचा व समाज व्यवस्थेच्या भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा… दिवसाढवळ्या बहीण जावयाने केला महिला वकिलावर चाकूने हल्ला

शिक्षणावर होणारा खर्च हा भविष्यातील नागरिक घडविण्यावर होणारी गुंतवणूक आहे. आपल्या मार्गदर्शनात तयार होणाऱ्या विद्यार्थ्याचे व्यक्तित्व आणि कर्तृत्व कसे असेल यावर देशाचे मूल्यांकन होईल. त्यामुळे पुढील ५० वर्षांचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून शिक्षकांनी काम करण्याची गरज आहे.’ ‘आपले गाव, जिल्हा, प्रदेश, राज्य आणि नंतर देशातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षणाचा संबंध सामाजिक- आर्थिक व्यवस्थेशी देखील आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण असताना ती सुसंस्कृत असणेही आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्चविद्याविभूषित विद्यार्थ्याची वागणूक, व्यवहार भविष्यात कशी असेल, याचा विचार शिक्षकांनी आत्ताच करणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले. शिक्षणाचा भावार्थ खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या प्रगल्भतेसोबत जीवन मूल्यांशी जोडलेला आहे. शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्यांनी तयार केलेला विद्यार्थी उद्याचा देशाचा नागरिक असेल. तो किती ज्ञानी आहे, हे तपासताना त्याचे व्यक्तित्व सामाजिकदृष्ट्या किती प्रगल्भ आहे, किती संस्कारित आहे, याचेही मुल्यांकन होणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी शैक्षणिक धोरणातील आपल्या भूमिकांशी कटिबद्ध राहण्याची गरजही गडकरींनी वर्तवली. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार मोहन मते, माजी आमदार नागो गाणार, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्र, देवदत्त जोशी, डॉ. राहुल बांगर, डॉ. विनोद मोहितकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.