लोकसत्ता टीम

नागपूर : जंगलातील अधिवासावर हक्क दाखवण्यासाठी वाघांच्या झुंजी कायमच होत असतात. त्यातही तरुण वाघांमध्ये स्वत:चा अधिवास तयार करण्यासाठी होणाऱ्या झुंजीचे प्रमाण अधिकच. मात्र, वृद्धत्वाकडे झुकणाऱ्या वाघाने अधिवासासाठी एका तरुण वाघाशी लढाई केली आणि तोच तोंडघशी पडला. गंभीर जखमी झालेल्या या वाघाला अखेर उपचारासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात आणण्यात आले.

दक्षिण उमरेड वनक्षेत्रातील म्हसाळा या गावालगतच्या जंगलात एक वाघ काहीही हालचाल न करता बराचवेळ एकाठिकाणी बसून असल्याचे गावकऱ्यांना दिसले. त्यांनी लगेच वनखात्याला ही माहिती दिली. यावेळी नागपूर येथील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राची चमू तात्काळ घटनास्थळी रवाना झाली. त्यांनी परिस्थितीची माहिती देताच प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करुन उपचारासाठी जेरबंद करण्याची परवानगी दिली.

आणखी वाचा-नागपूर: शेतकऱ्यांसह आता सर्वसामान्यांचेही पावसाकडे डोळे

त्यानंतर उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन काकडे, डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. पंकज थोरात, सिद्धांत मोरे, उमरेड येथील पशुधनविकास अधिकारी डॉ. स्मिता रामटेके यांच्यासह उमरेड येथील प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक विजय गंगावणे, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांच्यासह बचाव कार्यात चेतन बारस्कार, आशीष महल्ले, बंडू मंगर, स्वप्नील भुरे, हत्तीथेले, कडवे, हरीश किनकर ही चमू वाघाला जेरबंद करण्यासाठी पशु रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचली. वाघाला ‘ट्रँक्विलायझिंग’ बंदूकीने बेशुद्ध करण्यात आले. नागपूर येथील सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात या वाघावर उपचार करण्यात येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गर्दीचे करायचे काय?

वाघ जागेवरुन हलत नसल्याचे बघून व त्याला जेरबंद करण्यासाठी आलेली चमू पाहून गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. काही हौसे नवसे छायाचित्रकार देखील कॅमेरे घेऊन येथे पोहोचले होते. शेवटी या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. मात्र, त्यानंतरही गावकरी ऐकायला तयार नव्हते. शेवटी पशु रुग्णवाहिका वाघाला घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाल्यानंतरच हा जमाव परत फिरला.