लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरसह देशाच्या इतर भागात सोने- चांदीचे दर सातत्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांचे चित्र बघितल्यास नागपुरात सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात दुप्पटीहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नासह इतर उपक्रमासाठी सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी उत्सूक कुटुंबात चिंता वाढली आहे.

नागपूरसह राज्यभरात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सतत सोने- चांदीच्या दरात वाढ होत असून या दरांनी नवीन विक्रम स्थापित केला आहे. बघता बघता ८ एप्रिलला नागपुरात सोन्याचे दर प्रति दहा ग्रामसाठी ७१ हजार ५०० रुपयेपर्यंत पोहचले होते. या दिवशी नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर २२ कॅरेटसाठी ६६ हजार ५००, १८ कॅरेटसाठी ५५ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४६ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ८२ हजार ४०० रुपये होते. हे दर १ एप्रिल २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्राम ६९ हजार रुपये होते. तर २२ कॅरेटसाठी ६४ हजार २०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५३ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४४ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचा दर प्रति किलो ७५ हजार ९०० रुपये होते.

आणखी वाचा-कोराडीत शिंदे-बावनकुळे भेट, राजकीय मुद्यावर चर्चा

त्यामुळे नागपुरात १ एप्रिल २०२४ च्या तुलनेत ८ एप्रिल २०२४ रोजीचे दर बघितल्यास सोन्याच्या दरात २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ६०० रुपये वाढ झाल्याचे दिसत आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे तब्बल ६ हजार ५०० रुपयांनी दर वाढले आहे. दरम्यान आता लग्न समारंभ वाढणार आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढल्याने सोने- चांदीचे दागिने खरेदीसाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढली आहे. सराफा व्यवसायिकांनी हे दर पुढे आणखी वाढण्याचाही अंदाज वर्तवला आहे.