पांढरकवडा येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील रमेश रामदास मेश्राम या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूची दखल अखेर आदिवासी विकास विभागाने घेतली. या प्रकरणी चौकशी करून दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे आणि शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तांना दिले आहे.

हेही वाचा >>>नागपूर : काँग्रेसला सद्यस्थितीतून बाहेर काढण्यासाठी डॉ. शशी थरूर एकमेव पर्याय – डॉ. आशीष देशमुख

यासंदर्भात ट्रायबल फोरम यवतमाळचे जिल्हा उपाध्यक्ष अंकित नैताम यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचेकडे तक्रार करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. केळापूर तालुक्यातील दागाडी पोड येथील रहिवासी रमेश मेश्राम हा विद्यार्थी बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथे कला शाखेत शिक्षण घेत होता. ८ जून २०२२ रोजी त्याला ताप आला. पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र त्याच्यासोबत शासकीय वसतिगृहातील अधीक्षक किंवा संबंधित कर्मचारी कोणीही गेले नसल्यामुळे त्याला दाखल करून घेण्यात आले नाही. अखेर त्याच्यासोबत असणाऱ्या वसतिगृहामधील काही विद्यार्थ्यांनी त्याला त्याच्या गावी पोहचवून दिले. त्यानंतर त्याचा १० जूनला मृत्यू झाला.

हेही वाचा >>> नागपूर : भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांच्यावर गुन्हा

मृत्यूच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मृताच्या बहिणीने केल्यानंतर प्रकरण अंगलट येऊ नये किंवा सामाजिक संघटनांना याबाबतची माहिती होऊ नये म्हणून मृतकाच्या बहिणीला चौकशीचे आणि आर्थिक मदतीचे आश्वासने देऊन सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कर्मचारी यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मेश्राम कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ट्रायबल फोरम संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत रमेश मेश्रामला योग्य न्याय देण्याची मागणी करत या प्रकरणात जबाबदार असलेले संबंधित गृहपाल, अधीक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आदिवासी विकास विभागासह शासनाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात आल्याने दोषींवर काय कारवाई होते, याची प्रतीक्षा आहे.