यवतमाळ : कृषिसंस्कृती ही श्रमसंस्कृती होय. श्रमकरी शेतकरी व त्यांचा सखा बैल यांच्या घामाने कृषीक्रांती घडली. या जगाच्या पोशिंद्याचा गौरव करण्याची परंपरा बळीराजाने सुरू केली. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा ग्रामीण भागात घरोघरी साजरा होतो.

शहरांमध्येही बैलपोळा साजरा होतो. पोळ्यात वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या झडत्या हे पोळा सणाचे आणखी एक वैशिष्ट्य. आज जिल्ह्यात ग्रामीण शहरी भागात साजऱ्या झालेल्या पोळ्यात सरकारच्या शेतकरी व कृषी विरोधी धोरणांविरोधात संताप व्यक्त करीत झडत्या सादर केल्या.

दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथील युवा शेतकरी नितीन कोल्हे हे पोळ्या‍निमित्त दरवर्षी नवनीवन झडत्या सादर करतात. या झडत्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकरी वापरतात. पोळ्यातील झडत्या हा प्रकार पूर्वापार चालत आला आहे. पूर्वी पारंपरिक झडत्या म्हटल्या जायच्या. अलिकडे या झडत्यांमधून सरकार, राजकीय नेते, वर्तमान परिस्थितीवर अधिक विडंबनात्मक भाष्य केले जात आहे. मात्र या झडत्यांनी पोळ्याची रंगत अधिकच वाढते. विशिष्ट लय, चालीत आणि खड्या आवाजातील या झडत्या अनेकदा ऐकणाऱ्याला मोहवून टाकतात.

एक्का गेला, दुरी गेली, गेली चौरी पंजी छक्की..!

कृषिमंत्र्याच्या रमीनं, कर्ज माफ होईन का हो नक्की..?

उजाड गावाचा पाटील, आमाले पडला भारी..!

मी पैका कुठून देऊ, माई रिकामी आलमारी..!

कास्तकाराचं सोयरं सतुक, धराले नाई कोणी..!

इरोधकाले मया, सत्ताधाऱ्याजवळ पैस्याची गोणी..!!

एक नमन गौरा.. पार्वती.. हर बोला.. हर.. हर.. महादेव..!!

अशा झडत्यांमधून सरकारवरील रोष पोळ्यामध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणावरही आजच्या पोळ्यात शेतकऱ्यांनी विडंबनात्मक काव्यातून टीका केली.

पोई रे पोई, पुरणाची पोई, मुख्यमंत्रीने देल्ली हो, कर्जमाफीची गोई..!

त्या गोईचा फुसका बार, कास्तकारावर पडला हो, कर्जाचा भार..!

त्या कर्जात, कास्तकाराचे येले सुरु, सरकार म्हणते, लवकरच अभ्यास करू..!

एक नमन गौरा… पार्वती… हर बोला… हर हर… महादेव..!

लाडकी बहीण योजनाही या झडत्यांमधून सुटली नाही. बहिणीचे लाड करताना दाजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्यांनी सुचविले.

बहीण रे बहीण, मुख्यमंतत्र्याची बहीण, त्या बहिणीचे, लाड हाय सुरु ..!

दाजीले पाचशेचा धतूरा, बहिणीले दोन हजार करू..!

बहीण मने हो दादाले, पैका नको दादा मले,

माया पोराले शिक्षण, अन दवाखाने कर त्याले..!

एक नमन गौरा… पार्वती.. हर बोला… हर.. हर.. महादेव..!!

सध्या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण झाली आहे. त्यावर भाष्य करताना,

दुष्काय रे दुष्काय, ओला दुष्काय, त्या दुष्कायात, कास्तकाराचे येले सुरु..!

मंत्री साहेब म्हणते हो.. “एका एकाचा सर्वे करू..!”

कापूस, सोयाबीन तूर, झाली हो मातीमोल,

बांधावर मंत्र्यानं, बेसन भाकर केली गोड..!

त्या भाकरीच्या मिठाले, जागतील का हो मंत्री,

का? आमच्या हातात धतूरा, तुमची गोड संत्री..!

एक नमन गौरा… पार्वती… हर बोला… हर हर महादेव..!! अशा काव्यातून विडंबन, टीका, संताप पोळ्यामध्ये बघायला मिळाला.