शिवजयंती निमित्त अमरावतीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात खासदार अनिल बोंडेंनी शिवव्याख्याते तुषार उमाळे यांच्या भाषणातील मुद्द्यांवर आक्षेप घेतला होता. “तू मूर्ख आहेस का?” असं त्यांनी तुषार उमाळेंना विचारलं होतं. यावर शिवव्याख्याते तरुण तुषार उमाळे यांनीही खासदार अनिल बोंडे यांना प्रतिप्रश्न करत “तुम्ही मूर्ख आहात का?” असं विचारलं. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रकरणावर आता खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा – भाजपा खासदार अनिल बोंडेंना थेट मंचावर ‘मूर्ख’ म्हणणाऱ्या तरुणाची प्रतिक्रिया; म्हणाला, “मरण आलं तरी…”

काय म्हणाले अनिल बोंडे?

स्वत:ला शिवव्याख्याते म्हणायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जी कल्पनाही करू शकत नाही, असं घाणेरडं बोलायचं, हे बरोबर नाही. आपण त्याचं भाषण ऐकलं तर तळपायातली आग मस्तकात जाईल, असं ते भाषण होतं. याला विरोध केलाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबाबद्दल असं बोलून जर जाती जातीमध्ये कोणी संघर्ष निर्माण करत असेल निश्चितच मी थांबवणार, अशी प्रतिक्रिया अनिल बोंडे यांनी दिली.

शिवजयंतीला आपला अजेंडा चालवायचा नसतो. त्यामुळेच मी त्याला भाषण सुरु असताना थांबवलं. महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर भाषण करताना तो शिवाजी महाराजांवर चांगलं बोलला. त्यावेळी मी टाळ्याही वाजवल्या. एखादा व्याख्याता तयार होणार असेल तो पूर्वग्रहदुषित नसावा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “महाराष्ट्रात काहीही झालं की एका व्यक्तीचं नाव येतं…”, पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांची मिश्कील टिप्पणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार उमाळे भाषणात नेमकं काय म्हणाले होते?

शिवव्याख्याते तुषार उमाळे भाषण करत असताना, शिवाजी महाराज मुस्लीमद्वेष्टे कसे नव्हते, याबाबत ते आपली भूमिका मांडत होते. यावेळी बोलताना, “शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने दाखवायचं, हेच आमच्या लोकांना कळलं नाही. शिवाजी महाराज म्हणजे मुस्लीमद्वेष्टे होते, असं दाखवण्यचा प्रयत्न केला जातो. महाराज नाष्टा करायचा आहे… दोन मुसलमान कापून या… ते गेले आणि खपाखप दोन मुसलमान मारले… नाष्टा केला… आता दुपारची जेवायची वेळ झाली… १२ वाजले… महाराज चार मुसलमान कापून या… ते गेले खपाखप चार मुसलमान कापून आले… मग जेवण केलं. संध्याकाळी पुन्हा जेवणाच्या आधी सहा मुसलमान कापले. झोपेतून उठलं की ते केवळ मुसलमानच मारायचे, महाराजांना दुसरा काही उद्योगच नव्हता, असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच की, महाराज कुठल्याही जाती धर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचं स्वराज्य निर्माण केलं होतं. मराठे जेव्हा लढायला जायचे, तेव्हा मावळ्यांना तुम्ही कोणत्या जातीचे आहात? असं विचारलं जात नव्हतं,” असं ते आपल्या म्हणाले होते.