नागपूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर आता मतदार याद्यांतील अनियमिततेचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर थेट मत चोरीचा गंभीर आरोप केला आहे. शेजारील मध्य प्रदेशातून भाजप कार्यकर्ते आणून काटोल आणि नरखेड मतदारसंघांमध्ये मतदान केल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले.
देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या काटोल मतदारसंघात सुमारे ३५ हजार बनावट मतं टाकण्यात आली. आम्ही तीन महिन्यांपासून मतदारयादीवर काम करत होतो. जवळपास ६० जणांची टीम यावर कार्यरत होती. मात्र निवडणुकीनंतर आम्हाला लक्षात आलं की मध्य प्रदेशातील अनेक लोकांनी काटोल आणि नरखेडमध्ये मतदान केलं आहे,असा दावा देशमुख यांनी केला.
त्यांनी पुढे सांगितले की, मध्य प्रदेशातील लांघा गावातील सरपंच वनिता पराडकर या भाजप कार्यकर्त्या असून, त्यांचे नाव मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडच्या मतदार याद्यांमध्ये आहे. देशमुख यांनी पराडकर यांची दोन्ही ठिकाणची मतदार ओळखपत्रे दाखवत “त्या महाराष्ट्रात मतदान केलं” असा दावा केला.
याचबरोबर, देशमुख यांनी काटोलचे विद्यमान भाजप आमदार चरणसिंह ठाकूर यांच्यावरही आरोप केला. त्यांच्या दोन भावांची नावं दोनदा मतदारयादीत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी दुबार मतदान केल्याचा आरोप केला. ही केवळ काही उदाहरणं आहेत, प्रत्यक्षात संख्येने हजारो मतं अशा प्रकारे ‘चोरी’ झाली आहेत, असं देशमुख म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनीही नुकतेच हरियाणात बनावट मतदारांद्वारे निवडणूक ‘चोरी’ झाल्याचा आरोप करत काही पुरावे सादर केले होते. या पार्श्वभूमीवर देशमुखांचा आरोप विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
