नागपूर : सोमवारी सकाळी खापरी मेट्रो स्थानकाच्या रुळावर फिरणाऱ्या एका कथित रानडुकराची चित्रफीत समाजमाध्यमांवर सामाईक झाली. सेमिनरी हिल्स येथील वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रालाही या घटनेची माहिती देण्यात आली. मात्र, केंद्राचे बचाव पथक त्याठिकाणी पोहोचले असता ते रानडुक्कर नसून स्थानिक डुक्कर असल्याचे लक्षात आले. दरम्यान, मेट्रोच्या रुळावर प्राणी आढळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाची चमू देखील खापरी मेट्रो स्थानकावर पोहोचली होती. स्थानिक डुक्कर असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने पुढील कारवाईचे आश्वासन दिले. त्यामुळे ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या बचाव पथकाची चमू परत गेली. मात्र, डुक्कर जंगली असो वा स्थानिक, तो अशाप्रकारे मेट्रो रुळावर येत राहीला तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी देखील साळींदर हा वन्यप्राणी मेट्रोच्या रुळावर आढळून आला. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या बचाव पथकानेच ही कारवाई पूर्ण केली.
खापरी स्टेशनजवळील रुळाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत, पण बहुतेक ठिकाणी प्राण्यांनी भिंतींच्या पायथ्याशी जमिनीच्या पातळीवर खड्डे खोदले आहे. या खड्ड्यांमधून ही डुकरे मेट्रो इमारतीत प्रवेश करत आहे. या इमारतीत अनेक वेळा डुकरांचे कळप एकत्र फिरताना दिसले आहे. हे डुकर खामला परिसरातील एका प्रसिद्ध डुक्कर प्रजननकर्त्याचे असल्याचे सांगितले जाते. त्यांनी खामला ते खापरीपर्यंतच्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये देशी डुकरांचे संगोपन केले आहे.
भिंतींखालील खड्डे भरणे गरजेचे
खापरी मेट्रो स्थानकापासून मिहानकडे जाणारा रुळ जमिनीच्या पातळीवर समांतर आहे. मिहान इमारत आणि आसपासच्या झोपडपट्ट्यांमध्ये बिबट्यांसह वन्य प्राण्यांची उपस्थिती अनेक वेळा नोंदवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी, मेट्रो स्थानकाच्या वरच्या रुळावर एक कोल्हा (वन्यप्राणी) पोहोचला होता. तर साळींदर हा प्राणीही मेट्रोच्या रुळावर आढळून आला. त्यामुळे, स्टेशनसमोरील मेट्रो रुळाची नियमित तपासणी केली जात आहे. इमारतीच्या भिंतींखालील खड्डे भरणे आवश्यक आहे.
महामेट्रो प्रशासन म्हणते..
मेट्रोच्या रुळांची नियमित तपासणी केली जात आहे. ज्या ज्या ठिकाणी खड्डे किंवा त्रुटी आढळून येत आहेत, त्या भरुन काढल्या जातील. प्रवाश्यांच्या सुरक्षिततेला कुठेही धोका पोहोचणार नाही, याची काळजी महामेट्रो प्रशासन घेत आले आहे आणि यापूढेही घेईल, असे महामेट्रोचे उपमुख्य व्यवस्थापक अखिलेश हळवे यांनी सांगितले.
