अमरावती: उडी मारणाऱ्या कोळीच्या (स्पायडर) ‘हायब्रोसिस्टम चिखलदरेंसीस’ या नवीन प्रजातीचा शोध मेळघाटात लागला आहे. या कोळीचा शोध चिखलदरा येथे लागल्यामुळे कोळीच्या नावात चिखलदरा हा शब्द टाकण्यात आल्याचे संशोधकांनी सांगितले. या संशोधनाने मेळघाटातील जैवविविधतेच्या संपत्तीला नव्याने अधोरेखित केले आहे.

हे संशोधन ‘सर्किट- द अरेक्नॉलॉजिकल बुलेटीन ऑफ द मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. हे संशोधन येथील कोळी अभ्यासक डॉ. अतुल बोडखे आणि त्यांच्या लखनौ विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी क्रितिका राव यांनी केलेले आहे. दर्यापूर येथील जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील कोळी संशोधन प्रयोगशाळेत या महत्वपूर्ण शोधावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

‘हॅब्रोसेस्टम जंपिंग स्पायडर’ हे जमिनीवर राहणारे मांसाहारी जीव आहेत. आकर्षक देखाव्यासाठी आणि वर्तनासाठी, विशेषतः त्यांच्या अपवादात्मक दृश्य तीक्ष्णतेसाठी ते ओळखले जातात. भारतातील पश्चिम घाट आणि युरेशिया आणि आफ्रिकेच्या इतर भागांसह विविध अधिवासांमध्ये ते आढळतात, काही प्रजाती ऑस्ट्रेलिया आणि सोलोमन बेटांमध्ये आढळतात. या कोळीच्या जगामध्ये एकूण ५९ प्रजातीचा आजपर्यंत शोध लागलेला आहे त्यापैकी नऊ प्रजाती भारतात आढळतात. ते सामान्यतः विविध अधिवासांमध्ये आढळतात, ज्यामुळे ते परिसंस्थेच्या आरोग्याचे महत्त्वाचे सूचक बनतात.

‘जंपिंग स्पायडर: हॅब्रोसेस्टम चिखलदरेंसीस’ हे कोळी ‘साल्टिसिडी’ कुटुंबातील आहेत. उडी मारण्याच्या क्षमतेसाठी आणि उत्कृष्ट दृष्टीसाठी ते ओळखले जातात. ते जमिनीवर राहतात, म्हणजेच ते त्यांचा बहुतेक वेळ जमिनीवर किंवा त्याच्या जवळ घालवतात. ते दिवसा सक्रिय असतात. ते जंगले, गवताळ प्रदेश आणि अगदी शहरी भागांसह विविध वातावरणात आढळू शकतात. ते त्यांच्या अधिवासातील कीटक आणि इतर लहान आर्थ्रोपॉड्सची शिकार करतात. ते जटिल वर्तन प्रदर्शित करतात, ज्यामध्ये प्रेमसंबंध विधी आणि छद्मवेश धोरणे समाविष्ट आहेत. ते कीटकांचे भक्ष्य करून नैसर्गिक कीटक नियंत्रणात भूमिका बजावतात. त्यांची उपस्थिती ज्या तेथील जैवविविधता परिसंस्थेत असणे म्हणजे त्या परिसंस्थेचे चांगल्या व सुदृढ आरोग्याचे संकेत आहे. या आधीही काळी संशोधन प्रयोगशाळेमधून बऱ्याच नवीन कोळी प्रजातींचा शोध लागलेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निसर्गाचे चक्र संतुलित ठेवण्यासाठी कोळ्यांचा मोठा उपयोग होतो. त्यांचे मुख्य खाद्य किडे, जंतू असल्यामुळे शेतातील पिकांवरील तसेच झाडावरील किडे खाऊन त्यांचे रक्षण ते करत असतात. तर कोळी स्वत: पक्षी, सरडे आणि अन्य कीटकांचे खाद्य असल्याने निसर्गाचे चक्र अबाधित ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. कोळ्यांनी तयार केलेले जाळे वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असते, असे डॉ. अतुल बोडखे यांनी सांगितले.