अकोला : आज रेल्वेने प्रवास करणार आहात? तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक कार्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता दिसून येते.
भुसावळ ते बडनेरा खंडातील ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्यामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला. भुसावळ विभागात भुसावळ ते बडनेरा खंडामध्ये शेगाव – श्रीक्षेत्र नागझरी आणि पारस दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी वाहतूक ब्लॉक घेण्यात येत आहे. या कार्यासाठी काही गाड्या रद्द करण्यात येणार असून, काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहेत. गाडी क्रमांक ६११०१ – भुसावळ ते बडनेरा मेमू, गाडी क्रमांक ६११०२ – बडनेरा ते भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ६१११५ – बडनेरा ते अमरावती मेमू, गाडी क्रमांक ६१११६ – अमरावती ते बडनेरा मेमू या गाड्यांचे गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी रद्दीकरण करण्यात आले आहे.
काही रेल्वे गाड्यांच्या वेळात बदल केले आहेत. गाडी क्रमांक १११२१ – भुसावळ ते वर्धा मेमू ही गाडी भुसावळ येथून १४.२५ वाजता सुटण्याऐवजी १५.१५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर एक्सप्रेस विभागात दोन तास ‘रेगुलेट’ करण्यात येईल. गाडी क्रमांक १२४८५ हजूर साहिब नांदेड – श्री गंगा नगर एक्सप्रेस विभागात १ तास १० मिनिटे ‘रेगुलेट’ केली जाईल. गाडी क्रमांक २०८२० ओखा – पुरी एक्सप्रेस विभागात २ तास ‘रेगुलेट’ करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे विभागाकडून हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
भक्तांची गैरसोय होणार
विदर्भाची पंढरी शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गुरुवारी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. असंख्य भाविक भक्त दर गुरुवारी शेगावची वारी करतात. दूरवरून भाविक शेगाव येथे दाखल होत असतात. असंख्य भाविक शेगाव येथे मेमू रेल्वे गाडीने येतात. ऐन गुरुवारीच मेमू गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे इतर गाड्यांसह वाहतूक व्यवस्था अतिरिक्त ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.