scorecardresearch

वर्धेतील लालनाला जलाशयावर ‘फ्लेमिंगो, क्रेन’चे आगमन; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

समूद्रपूर तालुक्यातील पोथरापाठोपाठ आता लालनाला धरण पक्ष्यांचा अधिवास म्हणून नावलौकिक

वर्धेतील लालनाला जलाशयावर ‘फ्लेमिंगो, क्रेन’चे आगमन; पक्षीप्रेमींसाठी पर्वणी

वर्धा येथील लालनाला जलाशयावर ‘फ्लेमिंगो’ व ‘क्रेन’ या विदेशी पक्ष्यांचे थेट युरेशियातून आगमन झाले आहे. समूद्रपूर तालुक्यातील पोथरापाठोपाठ आता लालनाला धरण पक्ष्यांचा अधिवास म्हणून नावलौकिक प्राप्त करीत आहे. लालनाला येथे या पूर्वी २०१७ ला शेंडी बदकाची जोडी आढळून आली होती. आता कॉमन क्रेन म्हणजेच क्राैंच हे पक्षी धरणाच्या काठावर विसावा घेत असल्याचे निसर्गसाथी संस्थेचे पक्षीनिरीक्षक प्रवीण कडू यांनी सांगितले. ही पहिलीच नोंद आहे.

हेही वाचा- उडत्या विमानातून धूर; नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणारा हा पक्षी नेहमी थव्याने आढळून येतो. सर्वभक्षी असलेला हा पक्षी कीटक, उंदीर, पक्ष्यांची अंडी, रोपांची मुळे, पिकांचे अवशेष असा सर्व खाद्यांवर ताव मारतो. यासोबतच लाल नाल्यावर सात फ्लेमिंगो दिसून आले. मराठीत त्यास रोहित, पांडव, अग्निपंख या नावानेही ओळखल्या जाते. मोठा रोहित हे ‘व्ही’ आकाराची माळ करीत हवेत उडतात तेव्हा त्यांच्या पंखांची शेंदरी व काळी किनार स्पष्ट दिसत असल्याने त्याचे अग्निपंख असे नामकरण झाले.

हेही वाचा- भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; पाच महिन्यांत तिसरी घटना

गिधाडापेक्षा मोठा असलेल्या या पक्ष्यास त्याची विशिष्ट चोच राजसी रूप प्रधान करते. मनुष्याने त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यापैकी हुशार असलेला आवाज काढून खाणे थांबवतो व इतरांना सर्तक करतो. एक एक पाऊल टाकून पाण्यात पॅडलिंग करीत हवेत उडतात. त्यांचे हे असे उड्डाण विहंगम दिसते. खेकडे, गोगलगाय, पानवनस्पतीच्या बिया आदींचा त्याच्या खाद्यात समावेश होतो. या पक्ष्याला प्रथमच लालनाला येथे पाहून पक्षी अभ्यासकांनी आनंद व्यक्त केला. या धरणाला लागून जंगल व शेतीचा भाग असल्याने मोठा रोहितसाठी हे स्थान उत्कृष्ट अधिवास समजले जाते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 11:04 IST