विदेशीच्या तुलनेत दहा टक्के किंमतीत कृत्रिम इंटरलॉकिंग जॉईंट!

नागपूरच्या डॉ. सुरेश चवरे यांना स्वामित्व हक्क; तोंड न उघडणारे, जबडे विस्कळीत असलेल्या रुग्णांना दिलासा   

नागपूरच्या डॉ. सुरेश चवरे यांना स्वामित्व हक्क; तोंड न उघडणारे, जबडे विस्कळीत असलेल्या रुग्णांना दिलासा   

नागपूर : जबडा विस्कळीत झालेल्या रुग्णांना जबडय़ाच्या जॉईंटवर कृत्रिम इंटरलॉकिंग जॉईंट प्रत्यारोपित करावे लागते. विदेशातील हे जॉईंट दीड ते दोन लाख वा त्याहून जास्त किमतीचे आहे. परंतु नागपूरच्या प्लास्टिक सर्जन डॉ. सुरेश चवरे यांनी एका देशी इंटरलॉकिंग जॉईंटचे संशोधन केले. व्हीएनआयटी संस्थेच्या मदतीने तयार या जॉईंटची किंमत विदेशीच्या तुलनेत दहा टक्के म्हणजे १५ ते २० हजारांच्या घरात आहे. त्याचे स्वामित्व हक्क (पेटंट) डॉ. चवरे यांना मिळाले असून हे देशातील या पद्धतीचे पहिलेच जॉईंट आहे.

वर्ष २००७ च्या दरम्यान डॉ. सुरेश चवरे यांच्याकडे १२ वर्षीय मुलगी आली. तिचे तोंड किंचितच उघडत असल्याने तिने पाच वर्षांपासून द्रवरूप पदार्थाच्या व्यतिरिक्त काहीच खाल्ले नव्हते. एका अपघातात मुलीचा जबडय़ाचा सांधा (जॉईंट) खराब झाला. हळूहळू तिचे तोंड उघडणे बंद झाले. ती अन्न चावू शकत नव्हती. बोलणेही खूप कमी झाले. यावर खराब झालेल्या जबडय़ाचा जॉईंटच्या जागी कृत्रिम जॉईंट प्रत्यारोपण करणे, हा उपचार होता. परंतु तिच्या कुटुंबाला हा महागडा उपचार परवडणारा नव्हता. शिवाय, मुलगी लहान असल्याने भविष्यात कृत्रिम जॉईंट निखळण्याची भीती होती. अशा स्थितीत ती मुलगी डॉ. चवरे यांच्याकडे आली. त्या मुलीलाच नव्हे तर तिच्यासारख्या अनेक रुग्णांना कमी खर्चात हा उपचार मिळावा, या उद्देशाने डॉ. चवरे यांनी संशोधन सुरू केले. या उपक्रमासाठी त्यांनी व्हीएनआयटीचे डॉ. अभय कुथे यांची मदत घेतली. डॉ. चवरे यांनी प्रथम मुलीच्या जॉईंटवर प्रत्यारोपणासाठी आवश्यक इम्प्लांटचे डिझाईन कुथे यांना दिले. ते प्रथम क्लेवर कच्चे बनवले गेले. त्यानंतर त्यात काही दुरुस्तीकरून स्टेनलेस स्टिलवर तयार केले गेले. मुलीच्या जॉईंटला साजेसे हे इम्प्लांट तयार झाल्यावर ते प्रत्यारोपित केले गेले. या प्रत्यारोपणाला तब्बल १४ वर्षे झाले असून अजूनही वेळोवेळी मुलगी डॉ. चवरे यांच्याकडे येत असते. या विषयावर डॉ. चवरे यांनी तयार केलेले संशोधन पत्र इंडियन जनरल ऑफ प्लास्टिक सर्जरी या जनरलमध्येही प्रकाशित झाले आहे. दरम्यान, चवरे यांनी स्वामित्व हक्कासाठी प्रक्रिया केली होती. त्याला यश मिळाले असून हे देशातील या पद्धतीचे पहिले पेटंट डॉ. चवरे यांच्या नावाने मिळाले आहे. दरम्यान विदेशी या पद्धतीचे इम्प्लांट दीड ते दोन लाख वा त्याहून जास्त किंमतीत येते. सोबत या इम्प्लांटचा आकार मोठा, ते प्रत्यारोपित करण्यासाठी दोन चिरे देणे, शस्त्रक्रियेला वेळ लागणे, हे इम्प्लांट लागल्यावर निखळण्याचा धोका असतो. परंतु डॉ. चवरे यांनी संशोधन केलेल्या या इम्प्लांटमुळे एकाच चिऱ्यात शस्त्रक्रिया होण्यासह त्यातील बरीच गुंतागुंतही कमी होण्यास मदत झाल्याचे डॉ. चवरे यांचे म्हणणे आहे.

मुख कर्करोग, संधीवात (आर्थरायटीस), अपघात व वाढत्या वयामुळे जबडय़ाचा जॉईंट याला वैद्यकीय भाषेत ‘टेम्परोमेंडीब्युलर जॉईंट’ म्हटले जाते, तो खराब होतो. यामुळे तोंड उघडणे आणि बंद होण्याची महत्त्वाची क्रिया बंद होते. यावर कृत्रिम जॉईंट बसवणे हाच उपचार असतो. हे जॉईंट देशात तयार होत नसल्याने खर्चिक होते. विदेशी इम्प्लांट दीड ते दोन लाख वा त्याहून जास्त किमतीचे आहे. परंतु नवीन विकसित केलेले स्टेनलेस स्टिलचे इम्प्लांट १५ ते २० हजारात तयार होते. हे इम्प्लांट टायटेनियमचेही बनवल्यास ते २० ते ३० हजाराहून जास्त महाग होऊ शकत नाही. त्यामुळे याचा देशातील रुग्णांना लाभ होईल.

–  डॉ. सुरेश चवरे, प्लास्टिक सर्जन, नागपूर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Artificial interlocking joint for lock jaw at ten percent price compared to foreign rate zws

ताज्या बातम्या