नागपूर : उमरेड परिसरातील खाण परिसरातून १ मे रोजी देशभरात वीज-ऊर्जा निर्मितीसाठी जाणारा कोळसा रोखला जाईल. स्वतंत्र विदर्भाची मागणी व महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांनी सांगितले.

टिळक पत्रकार भवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. चटप म्हणाले, आंदोलन १ मे रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल व स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचे रणशिंग फुंकले जाईल. कोळशाचे उत्पादन विदर्भातील नागपूर, यवतमाळ व चंद्रपूर याच जिल्ह्यात होते. तर येथे या कोळशाच्या जोरावर ६ हजार ३०० मेगावॅट वीज तयार होते. त्यापैकी विदर्भाला २,२०० मेगावॅट वीजच वापरावयास मिळते. विदर्भात ५८ टक्के कृषीपंपाचा अनुशेष असून ६ ते १२ तास लोडशेडिंग सहन करावे लागते. प्रदूषणामुळे विदर्भात श्वसन व फुफ्फुसाशी संबंधित आजार वाढले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आरपारची लढाई समजून १ मे रोजी आंदोलन करत असल्याचेही चटप यांनी सांगितले. महाराष्ट्रावर ६ लाख ६० हजार कोटींच्या कर्जाचा बोजा असून देशात सर्वाधिक कर्ज महाराष्ट्रावर आहे.

हेही वाचा – वर्धा : चुलीतून आगीचा भडका उडाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले; युवकाचा होरपळून मृत्यू

हेही वाचा – “कुशल मनुष्‍यबळ निर्मिती ही शिक्षण क्षेत्राची जबाबदारी”, उपमुख्‍यमंत्री फडणवीस म्हणतात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदल्यासाठी शासनाने एमएसआरडीसीला ६५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास परवानगी दिली असून, हा कर्जाचा बोजा राज्यावर असून महाराष्ट्राची वाटचाल दिवाळखोरीकडे आहे. उमरेड खाण परिसरात महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून सर्व आंदोलक त्यादिवशी काळ्या पट्ट्या, काळे वस्त्र व काळ्या टोप्या परिधान करून आंदोलनात सहभागी होतील, असेही चटप म्हणाले. पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, अरुण केदार, मुकेश मासुरकर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार, नरेश निमजे, मृणाल मोरे उपस्थित होते.