बुलढाणा : जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत नांदुरा येथून तब्बल ४१ तलवारी जप्त करण्यात आल्या आहे. प्राप्त माहितीनुसार खामगांव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (भा.पो.से.) तसेच त्यांचे अधिनस्थ अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी काल बुधवारी रात्री ही संयुक्त कारवाई केली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (भा.पो.से.) यांना यासंदर्भातील खात्रीलायक टीप मिळाली होती. मिळालेल्या माहीती वरुन श्रेणिक लोढा (भा.पो.से.) यांनी आपल्या कार्यलयातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस जमादार शिवशंकर वायाळ त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणाचे पोलीस उप निरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस हवालदार चाँद शेख, पोलीस हवालदार गणेश पाटील, पोलीस अंमलदार बुलढाणा यांनी नांदुरा गाठले. या संयुक्त पथकाने नांदुरा येथील शेख वसीम शेख सलीम (रा. शाहीन कॉलनी, नांदुरा) याचे घर गाठले. शेख वसीम राहते घरुन धारदार तलवारी अवैधरित्या विक्री करण्यासाठी मोटार सायकलने बाहेर जाणार अशा माहीती मिळाली होती.

यामुळे या पथकाने शेख वसीम शेख सलीम याचे घर गाठले. यावेळी आरोपी शेख वसीम शेख सलीम हा त्याची पल्सर मोटार सायकल (क्रमांक एम.एच २८ बि.एन २२७७) वर एक पांढऱ्या रंगाच्या पोतडीचा लांब गठ्ठा गाडीवर ठेवून कुठेतरी बाहेर जाण्याच्या तयारीत दिसला. पथकने त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख वसीम शेख सलीम (वय ३३ वर्ष, रा. शाहीण कॉलणी, नांदुरा )असे सांगीतले. त्याचे ताब्यात असलेल्या पांढऱ्या गठ्ठ्याची तपासणी केली असता त्यामध्ये लाल म्यान असलेल्या एकूण 41 तलवारी सापडल्या.

या तलवारीवर ‘सिरोही की सुप्रसिध्द तलवार १०० साल वारंटी’ असे दोन्ही बाजुने कोरले असल्याचे दिसून आले. कोरलेल्या तलवारींची मुठीसह एकूण लांबी ८२ सें.मी, पात्याची लांबी ७० सेंमी व मुठीची लांबी १२ सेंमी व पात्याची मधोमध रुंदी ४ सेंमी असलेल्या एकूण ४१ तलवारी हस्तगत करण्यात आल्या. त्यांची किंमत ८२ हजार रुपये असल्याचे आरोपीने सांगितले. या तलवारीसह आरोपी याचे ताब्यातून काळ्या रंगाची पल्सर दुचाकी किमती ८० हजार रुपये व २० हजार रुपयांचा एक भ्रमणध्वनी जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण १,८२,००० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपीला पथकाने ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई निलेश तांबे पोलीस अधिक्षक, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली श्रेणिक लोढा अपर पोलीस अधिक्षक खामगांव, एपीआय सचिन पाटील (वाचक), कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील पो.नि. सुनिल अंबुलकर व स्थागुशा चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये यांनी फिर्याद दिली. नांदुरा पोलिसांनी आरोपी शेख वसीम विरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४, ७, २५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.