चंद्रपूर : अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून २०१९ ची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून ७२ हजारांपेक्षा अधिकच्या विक्रमी मताधिक्क्यानी जिंकणारे किशाेर जोरगेवार यांचे मताधिक्य भाजपमध्ये प्रवेश करताच ५० हजारांनी कमी झाले आहे. जोरगेवार केवळ २२ हजार ८३३ मतांनी जिंकले आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांनी चांगली लढत दिली.

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी व महायुती असा सातत्याने पक्ष बदलाचा इतिहास आलेले अपक्ष आमदार निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेशासाठी गेले होते. मात्र तिथे पवार यांनीच त्यांना पक्षप्रवेश नाकारला. त्यानंतर मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या मध्यस्थीने भाजपत प्रवेश घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पक्ष बदल करणाऱ्या जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. तसेच सामान्य व सतरंजी उचलणारा कार्यकर्ता ब्रिजभूषण पाझारे याला उमेदवारी द्यावी, यासाठी थेट दिल्ली गाठली होती. मात्र शेवटी जोरगेवार यांचा प्रवेश मुनगंटीवार यांच्याच हस्ते चंद्रपुरात झाला.

हेही वाचा – ना भाजप ना कमळ, ओन्ली सुमित… भाजपच्या विक्रमी विजयाचा मंत्र

जोरगेवार यांनी पहिल्या टप्प्यात प्रचारात चांगली आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात प्रचारात मागे पडले. परिणामी जोरगेवार यांची मतांची आघाडी ५० हजार मतांनी कमी झाली. जोरगेवार यांचा २२ हजार ८३३ मतांनी विजय झाला. त्यामुळे आता जोरगेवार यांनी भाजपत प्रवेश केल्याने त्यांचे मताधिक्क्य कमी झाले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

हेही वाचा – विदर्भ: ओबीसींची ‘घरवापसी’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोरगेवार यांना १ लाख ५ हजार ६८१ तर पडवेकर यांना ८२ हजार ७८९ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला अनुक्रमे २५ हजार व १४ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली नव्हती. मात्र २०२४ मध्ये विक्रमी ८२ हजार ७८९ मते मिळाली आहे. पडवेकर यांनी जोरगेवार यांना कडवी लढत दिली. विशेष म्हणजे पहिल्या दोन ते तीन फेऱ्यांमध्ये पडवेकर यांनी आघाडीही घेतली होती. पडवेकर यांच्या पाठिशी काँग्रेसचे संघटन पूर्ण शक्तीनिशी उभे राहिले असते आणि आर्थिक पाठबळ दिले असते तर आज चित्र वेगळे असते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जोरगेवार यांना एकाअर्थी कमी मताधिक्यांचा विजय मिळाला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.