महेश बोकडे
नागपूर : उपराजधानीत पावसाचा जोर वाढल्याने वारंवार त्वचा भिजून बुरशीजन्य संक्रमणामुळे होणारे ‘नायटा’ व ‘गजकर्ण’ यासारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील त्वचारोग तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) त्वचारोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज सुमारे ४०० रुग्ण उपचाराला येतात. पावसाळ्याच्या पूर्वी साधारणत: १० ते १५ टक्के रुग्ण हे बुरशीजन्य संक्रमणाचे म्हणजे नायटा, गजकर्ण, चिखल्यांची बाधा झालेले राहत होते. परंतु पावसाचा जोर वाढल्यावर या विभागात सुमारे ४० टक्के म्हणजे १६० रुग्ण हे बुरशीजन्य संक्रमणाशी संबंधित येत आहेत.
रुग्णांच्या त्वचेवर नाण्याच्या किंवा अंगठीच्या आकाराचे वर्तुळ तयार होऊन तेथे खाज येते. सतत घाम येणाऱ्या किंवा कायम ओलसर असलेल्या भागात अधिक आणि वारंवार, अशी वर्तुळे तयार होतात. ओलावा बुरशीच्या वाढीस प्रोत्साहन देतो आणि त्यामुळे संसर्ग वाढतो. अशी वर्तुळे हाता पायांच्या बोटांमध्ये आणि पायाच्या तळव्यातही होऊ शकतात. पाय जास्त वेळ ओलसर बुटांमध्ये राहिल्यानेही, अशी समस्या उद्भवते. बोटांतील बुरशीजन्य संसर्गामुळे नखे विकृत होऊ शकतात, अशी माहिती मेडिकल रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. जयेश मुखी यांनी दिली.
हेही वाचा >>>कारधा पुलावर लागले कायमस्वरूपी बॅरिकेटस्; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
“या रुग्णांना विशिष्ट अँटीफंगल क्रीम, डस्टिंग पावडर, तोंडावाटे अँटीफंगल औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिली जातात. ओलसर हवामानात हे संक्रमण वाढते. या रुग्णांनी आंघोळ केल्यावर व्यवस्थित सुती कपड्याने त्वचा कोरडी करायला हवी. संक्रमित रुग्णाचे कपडे वेगळे धुणे, कपडे घालण्यापूर्वी ते कोरडे असावे ही काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मेडिकलमध्ये या रुग्णांसाठी उपचाराची अद्ययावत सोय आहे.”- प्रा. डॉ. जयेश मुखी, विभागप्रमुख, त्वचारोग विभाग, मेडिकल.
हेही वाचा >>>बुलढाणा: जैन समाजाचा चिखलीत मूक मोर्चा
आजार टाळण्यासाठी काय कराल?
- हात-पाय कोरडे ठेवावेत
- स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावे
- बुरशी लागल्यावर कपडे गरम पाण्याने धुवावेत
- डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रिमचा वापर करावा
- अंगाला चिकटणारे कपडे वापरणे टाळावे
- भिजलेले कपडे वेगळे ठेवावेत