गोंदियाः ‘असर’ या संस्थेकडून वर्ग दुसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा बाबत चाचपणी करण्यात आली. दरम्यान पाचवीच्या विद्यार्थ्यांना वर्ग दुसरीची दोन अंकी बेरीज, दोन अंकी वजाबाकी, भागाकार व वाचन येत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. गोंदिया जिल्ह्यात जि. प. शाळेचे किमान ५० टक्के विद्यार्थ्यांची अशीच शैक्षणिक पातळी असल्याचे समोर आले आहे. ही बाब बुधवारी खुद्द शिक्षण विभागाने शिक्षणमंत्र्याच्या आढावा बैठकीत मांडली. यामुळे सलग अडीच तास चाललेल्या आढावा बैठकीच्या अंतिम टप्प्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी ‘असर’ संस्थेच्या अहवालातून समोर आलेल्या शैक्षणिक दर्जाच्या वास्तव्याबाबत खंत व्यक्त केली. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि चळवळ प्रभावहिन ठरत असल्याचे  त्यांनी व्यक्त केले.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे बुधवार ६ जुलै रोजी गोंदिया जिल्हयाच्या दौऱ्यावर आले . सायंकाळी ५:३० वाजता सुमारास शिक्षणमंत्र्यांचे जिल्हा व जि. प. प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर जि. प. च्च्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. सलग दोन तास जिल्हा परिषद सभागृहात यंत्रणेकडून जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा मांडण्यात आला. सर्वप्रथम जि. प. चे मुख्यकार्यपालन अधिकारी मुरुगानंथम यांनी शिक्षण विभागाची इंतभूत माहिती दिली. यानंतर शिक्षण

व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हिवारे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्च्या शाळेतील शैक्षणिक दर्जाचे आढावा सादर केला. आढावा दरम्यान ‘असर’ संस्थेने सादर केलेल्या अहवालात गोंदिया जिल्हा परिषद राज्याच्या एकूण प्रगतीच्या आलेखात मागासलेला आहे. तसेच सिंधदुर्ग, सातारा या जिल्ह्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा खालावलेला असल्याचा आढावा मांडला. त्यातल्यात्यात ‘असर’ संस्थेने केलेल्या चाचपणीत वर्ग पाचवीचे जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना वर्ग दुसरीची दोन अंकी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि वाचन देखील करता येत नाही, असे समोर आले असल्याचे मांडण्यात आले. यामुळे आढावाच्या शेवटच्या सत्रात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत ‘असर’ संस्थेने मांडलेल्या अहवालाला घेवून खंत व्यक्त केली.

गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा कसा उंचावणार, याबाबत यंत्रणेने प्रयत्न करावे, अशा सुचनाही केल्यात. त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात अनेक उपक्रम व चळवळ राबविण्यात आले. मात्र त्याबाबतचे उद्देश पूर्ण झाले नाही, असे जाणवत असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. जोपर्यंत उपक्रम तथा चळवळीचे उद्देश सर्वसामान्य जनतेपर्यंत रुजत नाही, तोपर्यंत आपण यशस्वी झालोत, असे समजू नये, असाही सुचक सल्ला यंत्रणेला दिला. जवळपास अडीच ते तीन तास शिक्षणमंत्र्यांनी शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, सभापती डॉ. लक्ष्मण भगत, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुकाअ मुरुगानंधम प्रामुख्याने उपस्थित होते.

शिक्षणमंत्र्या कडून जिल्हा यंत्रणेला सल्ला

शिक्षण विभागासाठी केंद्र व राज्य सरकार झुकते माप देत आहे. त्यामुळे या विभागासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ.

समर्पित भावनेतून शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. त्या शिक्षकांची शासन स्तरावर निश्चितपणे दखल घेऊ.

जिल्ह्यातील कोडेलोहारा या शालेय प्रशासनाने विद्यार्थ्यांना बालपणापासून स्वच्छतेचा संदेश रूजविला आहे. हे उल्लेखनिय कार्य राज्यस्तरावर राबविण्यात येणार.

ज्या शाळेच्या अडीअडचणी आहेत. त्या शाळेत प्रशासनाने यंत्रणेमार्फत शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले पाहिजे. तसेच यंत्रणेदेखील त्या अडीअडचणी शासनस्तरावर पोहोचविण्याचे काम केले तर त्या अडचणी निश्चितपणे सोडविण्यात येतील.