नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारण्याचे काम करत आहे. आशिया खंडातील पहिला चार स्तरीय वाहतूक असलेला डबल डेकर उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

नागपूर शहरातील कामठी मार्गावरील एलआयसी चौक ते ऑटोमोटीव्ह चौक दरमान्य चार स्तरीय वाहतूक असलेला डबर डेकर उड्डाण पूल आशिया खंडात प्रथमच तयार करण्यात आला आहे. अभियांत्रिकीच्या या अप्रतिम कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापूर्वी वर्धा मार्गावरील डबल डेकर पुलाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. नागपुरात अजनी चौक ते एअरपोर्ट हा डबल डेकर उड्डाणपूल, पूर्व नागपूरच्या पारडी मध्ये असणारा डबल-डेकर पूल आहे. सर्व उड्डाणपूल एनएचएआयने उभारले आहे.

कामठी मार्गावरील डबल डेकर उड्डाण पूल एनएचएआय आणि महामेट्रोने पूर्ण केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आशियातील सर्वात लांब डबल डेकर मार्गांपैकी एक आहे. ८९७ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलामध्ये केवळ डबल डेकर पुलाचा खर्च ५७३ कोटी रुपये आहे. ५.६ किमी लांबीच्या ४-लेन कामठी रोडवर असणा-या या डबल डेकर उड्डाणपुलाच्या संरचनेत रिब आणि स्पाइन या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, त्यामुळे नैसर्गिक प्रकाश आणि हवा पुरेशा प्रमाणात उड्डाणपुलामध्ये येऊ शकते. ही रचना उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गाला जोडून चार-स्तरीय वाहतूक व्यवस्था तयार करते. पहिल्या स्तरावर राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वे ट्रॅक आणि तिस-या स्तरावर उड्डाणपूल तर चौथ्या स्तरावर रेल्वे मेट्रो मार्ग आहे. गड्डिगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटीव्ह चौक अशी पाच मेट्रो स्थानके या उड्डाण पुलावर आहेत. विशेष म्हणजे गड्डी गोदामजवळ १६५० टन क्षमतेचा पोलादी पूल तयार करून बसवण्यात आला आहे. एवढ्या वजनाची क्षमता असलेला पूल शहरी भागात प्रथमच बांधण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कामठीकडे जाणाऱ्या या मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वाराजवळ अंडरपास आहे. बहुस्तरीय वाहतूक व्यवस्था झाल्यानंतर येथे पावसाचे पाणी अधिक साचू लागले आहे. शेकडो वर्षे जुन्या या अंडरपासमध्ये यापूर्वी एवढ्या प्रमाणात पाणी साचत नव्हते. १७ जुलै २०२५ ला नागपुरात पाऊस झाले आणि या पुलाखाली पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.