अकोला : पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात आरोपीला मदत करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षकाने चक्क एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात ५० हजारांची लाच घेतांना लाचखोर पोलिसाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात बुधवारी अटक केली. भागवत परसराम कांबळे (५५, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दहिहांडा पोलीस ठाणे, रा.तारफैल,अकोला) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे.
जिल्ह्यातील दहिहांडा पोलीस ठाण्यामध्ये अप.क्र. १७९/२०२५ कलम ३०३ (२) बी. एन. एस. २०२३ अन्वये गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये तक्रारदार २७ जून २०२५ रोजी पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी तक्रारदाराची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत कांबळे याने भेट घेऊन ‘मी तुझ्याविरूध्द दाखल गुन्ह्यामध्ये तुला मदत करतो, त्यासाठी तू मला एक लाख रुपये आणून दे’ असे सांगितले. पोलिसाने आरोपीकडे लाचेची मागणी केली. तक्रारदाराने या विरोधात ३० जून रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात धाव घेतली.
लाच प्रकरणात तक्रार दाखल झाल्यावर त्याच दिवशी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये भागवत कांबळे याने तक्रारदाराकडे तडजोडी अंति ५० हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणात आज सापळा रचण्यात आला. अकोला ते अकोट मार्गावरील कासली फाटा येथे भागवत कांबळे याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष ५० हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारली. दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने लाचखोर पोलिसाला तात्काळ ताब्यात घेतले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक मिलींदकुमार बहाकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण वेरूळकर, पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, पोलीस अंमलदार डिगांबर जाधव, संदिप ताले, अभय बावस्कर, असलम शाह, प्रदिप गावंडे व श्रीकृष्ण पळसपगार यांनी केली. लाच प्रकरणी काही दिवसांपूर्वीच एका पोलिसावर कारवाई झाली होती. त्यानंतर आता तब्बल ५० हजारांची लाच घेतांना एएसआय रंगेहात अडकल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्यावतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.