अमरावती : सरासरी दर वर्षाला ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सर्वाधिक असते. या घटनेला खगोल शास्त्रात अेफिलिऑन (अपसूर्य) असे म्हणतात. पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५ कोटी कि.मी. आहे. या अंतराला खगोल शास्त्रात एक खगोलीय एकक असे म्हणतात. ४ जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर सरासरी १५२ दशलक्ष कि.मी. राहील. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा ही लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते. या दिवसात दरवर्षाला फरक पडू शकते.

सूर्य हा तप्त वायूचा गोळा असून, यात हायड्रोजनपासून हेलियम बनण्याची क्रिया अहोरात्र चालू असते. सूर्याच्या केंद्रात एक सेकंदात ६५ कोटी ७० लाख टन हायड्रोजन जळते. त्यापासून ६५ कोटी २५ लाख टन हेलीयम बनते. कमी झालेल्या ४५ लाख टन वस्तुमानाचे रुपांतर सौर उर्जेत होते. सूर्यावरील ज्या भागाचे तापमान कमी होते, त्या भागावर सौर डाग पडतात. या डागाचे चक्र ११ वर्षांचे असते. या डागाचा शोध १८४३ मध्ये श्वाबे या वैज्ञानिकाने लावला. मानवनिर्मित उपग्रहावर या डागाचा परिणाम होतो. दर १ लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटर ओढली जात आहे. ५ खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. त्यामुळे न्यूयार्क शहर हे लंडनपासून दरवर्षाला २.५ सें.मी. दूर जात आहे.

पृथ्वी आणि सूर्यामधील अंतरातील बदल आपल्या हवामानावर फारसा परिणाम करत नाहीत, कारण पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेतील बदलांपेक्षा ऋतू आणि हवामान यासाठी पृथ्वीचा अक्षीय कल अधिक महत्त्वाचा आहे. ४ जुलै रोजी पृथ्वी सूर्य हे अंतर अधिक असल्याने या खगोलीय घटनेचा संपूर्ण सजीव सृष्टीवर कोणताही वाईट परिमाण होणार नाही. पंरतु सूर्याकडे सरळ साध्या डोळ्याने पाहणे धोक्याचे ठरेल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे

सूर्याचे वय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर ऑर्थर एडींग्टन यांनी सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. यापैकी ५ अब्ज वर्षे संपले असून ५ अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल. सूर्यावरून कधीकधी चुंबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. १८५९ मध्ये हे वादळ आले होते. त्यामुळे जगातील टेलीग्रॉफ यंत्रणा बंद पडली होती या वादळाला केरीग्टन इव्हेंट हे नाव दिले होते. अशा वादळामुळे सॅटेलाईट, जी.पी.एस. यंत्रणा पूर्णपणे बंद पडतात.