नागपूर : “पर्यावरण, जंगल आणि वन्यप्राणी ही केवळ संपत्ती नाहीत, ते आपला श्वास आहे. त्यांचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्राची खरी सेवा. ही पवित्र जबाबदारी तुम्ही प्रेमाने, करुणेने आणि समर्पणाने पार पाडा”, असे आवाहन माजी राज्यपाल डॉ. कमल गवई यांनी केले.
भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री व माजी राज्यपाल डॉ. कमल गवई यांनी नुकतेच चिखलदरा येथील वनप्रशिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी वनप्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे, पद्मश्री दिवंगत डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र दिपक गायकवाड, क्रीडा प्रशिक्षक सुधीर आक्केवार, वन्यजीव अभ्यासक मुकेश चौधरी, प्रसन्न गायकवाड, गोपाल गायकवाड उपस्थित होते. यावेळी डॉ. कमल गवई यांनी प्रशिक्षणार्थी वनरक्षक व वनपालांशी भावनिक संवाद साधला.
तुम्ही निवडलेला वनसेवेचा मार्ग खडतर असला तरी त्यामध्ये सेवेचा भाव जोडला तर तुमचा मार्ग सुकर होईल. त्यासाठी वेळ काढून पुस्तके वाचा, विपश्यना करा, निसर्गाची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही. मला रमाबाई आंबेडकर, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ होता येणार नाही, पण मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा मोठा मुलगा भूषण गवई हा भारताचा सरन्यायाधीश आहे, तो अनेक समाज हितासाठी चांगले- चांगले आणि धडाडीचे निर्णय घेत आहे, त्याच्या हातून देशसेवा घडत आहे हे बघून मला आनंद होतो, असे म्हणत संकट घेऊन रडत बसण्यापेक्षा मार्ग काढत राहा असा सल्ला त्यांनी प्रशिक्षणार्थींना दिला. ही सदिच्छा भेट प्रशिक्षणार्थी वनरक्षक व वनपालांच्या आयुष्यात स्मरणीय क्षण ठरली. चिखलदऱ्याच्या हिरव्यागार डोंगरकपारींमध्ये वसलेल्या वन प्रशिक्षण संस्थेला एक विलक्षण भावस्पर्शी क्षण लाभला. करुणामयी मातृहृदयातून लाभलेला आशीर्वाद हा त्यांच्या जीवनात अनमोल प्रेरणेचा ठेवा ठरेल, अशी भावना आमच्या सर्वांच्या मनात दाटून आली, असे वन प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका मुक्ता टेकाळे यांनी आभार प्रदर्शनातून सांगितले.
सिंधुताई सपकाळ यांचे स्वप्न पुर्ण करा!
पद्मश्री दिवंगत डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या चिखलदऱ्यातील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहाला डॉ. कमल गवई यांनी सदिच्छा भेट देऊन मुलींना मार्गदर्शन केले. मेळघाटातील आदिवासी मुलींना शिक्षित करण्यासाठी सिंधुताईंनी १९८० च्या काळात पुढाकार घेतला. आज एवढ्या वर्षात हजारो मुली शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत. तुम्ही मुलींनी खूप खूप शिक्षण घेऊन सिंधुताईंचे स्वप्न पुर्ण केले पाहिजे. तुम्ही शिकलात तर आपल्या मेळघाटला लागलेला कुपोषणाचा कलंक दूर होण्यासाठी तुमचे शिक्षण उपयोगी पडेल, तसेच आदिवासिंचा स्तर उंचावण्यास मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.