नागपूर : पाकिस्तानमधील काही लोकांशी संपर्क ठेवले या माहितीवरून दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) नागपूर शाखेने नागपूर जिल्ह्यातील कामठी मधून दोघांना शनिवारी पहाटे चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून एटीएसच्या पथकाकडून त्यांची कसून चौकशी सूरु आहे.
एटीएसच्या नागपूर युनिटने शनिवारी पहाटे दोघांनी जुना कामठी येथून चौकशीसीठी ताब्यात घेत ही कारवाई केली. जुनी कामठी पोलीसांचे पथकही या कारवाईत होते. ताब्यातील दोन्ही लोक मागील बऱ्याच काळापासून कामठीत राहत होते व ते समाज माध्यमांवर सक्रिय होते. समाज माध्यमांवरून ते दोघे पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात होते. त्याची गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाकावी मिळाली. त्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना चौकशीसाठी एटीएसच्या नागपूर कार्यालयात नेण्यात आले.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला कारगिलमधून नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेली होती. ती महिला देखील समाज माध्यमातूनच पाकिस्तानमधील व्यक्तींच्या संपर्कात आली होती. पाकिस्तानी रेंजर्सने तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिची सखोल चौकशी झाली होती. आता कामठीतील दोन्ही व्यक्ती नेमके कुठल्या कारणासाठी पाकिस्तानमध्ये संपर्कात होते याची दहशताद विरोधी पथकातल्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे.