लोकसत्ता टीम
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत अभिषेक उर्फ भांजा गुलाबे हत्याकांडातील आरोपींच्या मित्रावर मृताच्या मित्रांनी जीवघेणा हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना सदर पोलीस ठाण्यांतर्गत व्हीसीए चौकात घडली. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा (३१) रा. नाईक तलाव, बांग्लादेश असे जखमीचे नाव आहे. मंगेश उर्फ मंग्या सुरेश चिरुडकर (२०) रा. इंदिरामातानगर आणि अभिषेक उर्फ घोडा गणेश गांगलवार (२०) रा. पाचपावली, अशी हल्लेखोरांची नावे आहेत. गत ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री अभिषेक उर्फ भांजा हा प्रेम प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी पाचपावली ठाण्यांतर्गत पंचकुआ परिसरात गेला होता. या दरम्यान रोहित नाहारकर, श्याम कुसेरे आणि राजकुमार लाचलवारने अभिषेकवर हल्ला केला. गंभीर जखमी अभिषेकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत भांजा आणि आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने पाचपावली परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली. दोन्ही गटात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. शुक्रवारी आरोपींची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. न्यायालयातून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. या दरम्यान दोन्ही गटाचे आरोपी न्यायालय परिसरात गोळा झाले होते.
आणखी वाचा-इंस्टाग्रामवर ओळखी झाली, मग प्रेम झालं… दहावीच्या विद्यार्थिनीसोबत नंतर काय घडलं?
चहा टपरीवर झाला आमना-सामना
दुपारच्या सुमारास न्यायालय परिसरातून रवाना झाल्यानंतर आरोपींच्या टोळीतील संजय व्हीसीए चौकाजवळील एका चहा टपरीवर उभा होता. दरम्यान मंगेश व त्याचे ३ साथीदार दुचाकीने तेथे आले. त्यांनी संजयवर शस्त्रांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आणि फरार झाले. माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. संजयला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा नोंदवून मंगेश आणि अभिषेकला अटक केली. इतर दोघांचा शोध सुरू आहे.