अकोला : चंद्रवारी (सोमवारी) कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील पहिला ‘सुपरमून’ पाहता येईल. यावेळी पौर्णिमा दोन दिवस असून, सूर्यमालेतील सर्वात सुंदर व वलयांकित ग्रह शनी रात्रभर चंद्रा सोबत असेल. याच वेळी या दोघांच्या जरा उत्तरेला आपल्यापासून सुमारे २२ लाख प्रकाशवर्ष दूर असलेल्या देवयानी आकाशगंगचे दर्शन नुसत्या डोळ्यांनी घेता येईल. आकाशातील या त्रिवेणी संगमाचा आनंद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

जेव्हा चंद्र पूर्ण पौर्णिमेला पृथ्वीच्या सर्वात जवळच्या बिंदूवर (याला ‘पेरीजी’ म्हणतात) असतो, तेव्हा सुपरमून दिसतो. या स्थितीमुळे चंद्र नेहमीपेक्षा मोठा आणि जास्त तेजस्वी दिसतो, आकाशात त्याचा आकार सुमारे १४ टक्के मोठा आणि तो साधारण ३० टक्के अधिक उजळ असतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने भ्रमण करतांना या दोघांमधील अंतर कमी अधिक होत असते. हे अंतर जवळ झाल्यावर चंद्र आकाराने मोठा आणि प्रकाशात वाढ होते. यालाच सुपरमून म्हणून ओळखतात. या वर्षातील पहिला ‘सुपरमून’ या पौर्णिमेला असून पृथ्वी व चंद्र यामधील अंतर सुमारे तीन लाख ६३ हजार ३०० कि.मी. असेल, असे प्रभाकर दोड म्हणाले.

चंद्र आपल्या कक्षेतील सर्वात जवळच्या बिंदूवर येतो, ज्याला ‘पेरीजी’ म्हणतात, आणि त्याच वेळी पौर्णिमा असेल, तर तो सुपरमून म्हणून दिसतो. सुपरमूनमध्ये उच्च शक्ती असल्याचे मानले जाते, त्यामुळे अनेकांना वाटते की सुपरमून हा प्रकटीकरणाचा सराव करण्यासाठी आणि सकारात्मक बदलांना आमंत्रित करण्यासाठी आदर्श वैश्विक काळ आहे. सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची गरज नाही. आकाश निरभ्र असल्यास छतावरून तो सहज पाहू शकता येईल. जगभरातील खगोलप्रेमींना ‘सुपरमून’ चे अद्भुत दर्शन होणार आहे. सर्वांना त्याचे विशेष आकर्षण राहणार असून मोठी पर्वणी लाभेल.

दोन महिन्यात तीन ‘सुपरमून’

सव्वा पाच वाजता शनी तर साडेपाच वाजता चंद्रोदय होईल. कोजागरीला घोटलेल्या दुधासोबत मीन राशीतील शनी दर्शन पर्वणीचा आनंद रात्रभर घेता येईल. पुढील दोन महिन्यांत ४ व ५ या तारखांना असे सलग तीन सुपरमून पाहता येतील. यातील ५ नोव्हेंबरचा चंद्र खूप जवळ व खूपच मोठा दर्शनीय राहील. सोबतीला पाच ग्रह आणि दोन धुमकेतू उत्साह वाढवतील, असे प्रभाकर दोड यांनी सांगितले.