नागपूर: पिपळा (डाकबंगला) ता. सावनेर येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल तुळशीराम पाटील (३२) यांच्या हत्या प्रकरणात अटकेतील सहआरोपी व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांचे पती सरपंच विष्णू कोककड्डे याच्या पोलीस कोठडीत सावनेर न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली. विशेष म्हणजे या हत्याकांडात अटक विष्णूला खापरखेडात तर दुसरा आरोपी हिमांशु कुंभलकरला कन्हान कोठडीत वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हत्याकांडासंबंधी गूढ उकलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हिमांशू दिलीप कुंभलकर (१९, रा. पिपळा डाकबंगला) याने चाकू व दगडाने वार करून अतुलची हत्या केली. अटकेनंतर त्याला सावनेर न्यायालयाने शनिवारपर्यंत तर विष्णूला गुरुवारपर्यंत कोठडी सुनावली. शिवाय, या घटनेचा तपास खापरखेडा पाोलिसांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला.
विष्णूची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पालीसांनी त्याची कोठडी वाढवून देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ती मान्य करीत विष्णूच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.