भंडारा : भंडाऱ्यातील साकोलीयेथे काल विचित्र अपघात घडला. दुचाकीला ऑटोनं जोरदार धडक दिली, त्यामुळे दोघे महामार्गावर पडले. त्या दोघांना डस्टर कारने जोरात धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर उकारा फाट्याजवळ हा विचित्र अपघात झाला. मृतक गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील यादवराव गोपालराव वघारे (वय ३६, रा. आमगाव) आणि जितेंद्र रवींद्र उपराडे (वय २८, रा. मोहनटोला) हे दोघे मोटरसायकलवर (क्र. एमएच ३५/एएम ०६७०) नागपूरकडे रोजगाराच्या शोधात निघाले होते. पण त्याआधीच काळाने घाला घातला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोच्या चालकाने प्रवाशांना महामार्गालगत उतरवून अचानक वाहन वळवले. यावेळी मागून येणाऱ्या मोटरसायकलची ऑटोला जोरदार धडक बसली. त्यामुळे दोन्ही तरूण रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या डस्टर कारने (क्र. एमएच ०४/जीजे ४३१८ दोघांना चिरडले. कारचालक अशोक भैय्यालाल काळसर्पे कवळी टोला, गोरेगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या अपघातात यादवराव यांचा जागीच मृत्यू झाला, तर जितेंद्र उपराडे कारखाली अडकून काही अंतर फरफटत गेला. त्याला गंभीर अवस्थेत साकोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यालाही मृत घोषित केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वुडुले, संदीप भगत आणि महेश नेताम करीत आहेत.