महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : विकसित देशातील नागरिकांकडून प्रतिकारशक्ती वाढवण्यास महत्त्वपूर्ण ‘आयुर्वेद, योग, आहार, विहार’मध्ये आता रस घेतला जात आहे. त्यामुळेच नागपुरातील एका केंद्रात चक्क युरोपातील विविध देशातून आजपर्यंत शंभरावर तरुणांनी येऊन ‘दोष व्यवस्थापन’ अभ्यासक्रम केला. हे विद्यार्थी आता त्यांच्या देशात आयुर्वेदमध्ये सेवाही देत आहे.

नागपुरातील आयुर्वेदचे शिक्षक डॉ. सुनील जोशी हे स्वित्झरलँडमधील युरोपीयन इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक स्टडी येथील विद्यार्थ्यांना शिकवतात. या संस्थेसोबत त्यांच्या नागपुरातील विनायक आयुर्वेद आणि पंचकर्म रिसर्च फाऊंडेशनने करार करून नागपुरातील विनायक पंचकर्मा चिकित्सालयामध्ये एक केंद्रही सुरू केले आहे. या केंद्रात २००८ पासून युरोपीयन देशातील विद्यार्थी दोष व्यवस्थापन हा आयुर्वेद अभ्यासक्रमासाठी येतात. नागपुरातील केंद्रात युरोपीयन देशातून अभ्यासक्रमासाठी येणाऱ्यांमध्ये ९५ टक्के विद्यार्थी हे त्या देशातील नागरिक आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसोबत स्वित्झरलँडमधील संस्थेकडून एक दुभाषिक अधिकारीही भाषांतरासाठी पाठवला जातो. नागपुरातील केंद्रात या साडेतीन आठवड्याचा अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक अर्हता विज्ञान शाखेत पदवी, वैद्यकीयच्या शरीरशास्त्र किंवा शरीरविज्ञान शास्त्रही आहे. अभ्यासक्रमात जीवनशैलीतील बदलासाठी आवश्यक आहार, विहार, योगासह आयुर्वेदच्या प्राथमिक औषधांबाबत सांगण्यात येते. कालांतराने हे विद्यार्थी अभ्यासक्रम झाल्यावर परत जाऊन युरोपात आयुर्वेदमध्ये सेवा देत असल्याचेही डॉ. सुनील जोशी यांनी सांगितले. या अभ्यासक्रमात त्यांच्या पत्नी व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शर्मिली जोशी याही मदत करतात.

आणखी वाचा-परीक्षेसाठी केवळ मुंबई केंद्र दिल्याने उमेदवारांची कोंडी; ‘एमपीएससी’च्या कारभाराविरुद्ध ओरड

डॉ. जोशींकडून सहा महिने परदेशात सेवा

नागपुरातील डॉ. सुनील जोशी ३२ वर्षांपासून अमेरिका, स्वित्झरलँड आणि जगातील वेगवेगळ्या देशात आयुर्वेदमध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत. ते सुमारे सहा महिने नागपुरात तर सहा महिने अमेरिका- स्वित्झरलँडसह युरोपीयन देशात वैद्यकीय सेवा देतात. ते आयुर्वेदिक शिक्षक म्हणूनही युनिव्हर्सिटी ऑफ मॅक्सिकोला गेल्या अनेक वर्षांपासून शिकवतात. भारत सरकारच्या एका समितीवरही ते होते. भारतात असताना ते ऑनलाईन पद्धतीने विदेशातील रुग्णांना सेवा देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुर्वेद औषधांचा दुष्परिणाम होत नाही. ही गोष्ट युरोपीयन नागरिकांनाही पटल्याने तेथे आयुर्वेदची मागणी वाढली आहे. स्वित्झरलँडमधील संस्थेसोबत करार करून नागपुरात केंद्र सुरू केल्यापासून तेथील १०० विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेतले. स्वित्झरलँड संस्थेसोबत करार केलेला हा एकमात्र अभ्यासक्रम भारतात आहे. -डॉ. सुनील जोशी, संस्थापक, विनायक आयुर्वेद आणि पंचकर्म रिसर्च फाऊंडेशन, नागपूर.