नागपूर : एका युवा व्यावसायिकाने कर्जबाजारीपणाला कंटाळून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता नवीन कामठीत उघडकीस आली. आयुष अजय त्रिवेदी (२६, ऑरेंज सीटी, राजा रॉयलजवळ, नवीन कामठी) असे मृत युवकाचे नावे आहे. अजय त्रिवेदी हे सावनेर-कामठी परीसरात बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड होते. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात नुकसान झाल्यामुळे आयुष हे कर्जबाजारी झाले. त्यामुळे ते तणावात राहत होते. त्यांनी सकाळी घरात एकटे असताना डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. गोळी झाडण्याचा आवाज आल्यामुळे कुटुंबियांनी घरात धाव घेतल्याने ही घटना उघडकीस आली. कुटुंबियांना आयुष हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आयुषनकडे पिस्तूल आली कुठून, याचा शोध पोलीस घेत आहेत.



