अमरावती : राज्यात काय चालले आहे, हे समजत नाहीये. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही गोष्टी लपल्या असतील, म्हणून ते कदाचित कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस करीत नाही.

अजितदादांची दादागिरी आजकाल सरकारमध्येही चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्येही चालत नाही, असे दिसून आले आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली येथे शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

तत्पुर्वी प्रसार माध्यमांसोबत बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. दुष्काळ पडला, तर आम्ही कर्जमाफी देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. निवडणुकीपुर्वी तुम्हीच सातबारा कोरा करू, अशी घोषणा केली होती. त्यापासून तुम्ही दूर झाले. हमीभावावर दहा ते पंधरा टक्केच शेतमालाची खरेदी झाली. उर्वरित शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच नाही, अत्यंत कमी किमतीत शेतमाल विकावा लागला. त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिले पाहिजे.

शेतमालाला कमी भाव मिळाल्यामुळे दुष्काळापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ते जाणीवपूर्वक विषय वेगळ्या पद्धतीने नेत आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. विदर्भातील शेतकऱ्यांचेच सर्वाधिक नुकसान झाले नाही. कर्जमाफीसाठी तुम्ही दुष्काळाची वाट पाहत असाल, तर त्यापेक्षा दुर्देवाची गोष्ट नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

शेतकऱ्यांनाही आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची प्रतीक्षा करावी लागेल आणि दुष्काळ येऊ दे अशी प्रार्थना करावी लागेल, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. बच्चू कडू म्हणाले, सहा लाख हिंदू मातांनी, बहिणींनी आपले सिंदूर गमावले, त्यावर पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री फडणवीस एक शब्द बोलत नाहीत. श्रद्धांजली तरी द्यावी, एवढेही त्यांच्या मनात येत नाही. मात्र २८ लोकांसाठी सिंदूर यात्रा काढली जाते. सहा लाख मरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तो ‘सिंदूर’ कुठे गेला? त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

घटक पक्षांना दबावात ठेवण्याचे भाजपचे राजकारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू म्हणाले, सर्व घटक पक्षांना दबावात ठेवण्याचे राजकारण भाजप करीत आहे. नुकताच अमित शहांचा फोन उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गेला. उद्धव ठाकरेंनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हे सगळे नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांनी केंद्रात काही हालचाल करू नये, यासाठी अप्रत्यक्ष इशारा देण्याचा प्रयत्न आहे. ‘तुम हट गये, तो हमारे पास पवार और ठाकरे है’, असे सगळे सूचकपणे दाखवण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे.